KBC: सहावीतल्या मुलाने १२ लाख जिंकले! पण, मारी बिस्किटच्या प्रश्नामुळे २५ लाख गमावले, तुम्हाला माहितीये का उत्तर?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 05:29 PM2024-11-05T17:29:20+5:302024-11-05T17:51:45+5:30
केबीसी ज्युनियरमधील पहिला स्पर्धक हॉटसीटवर बसला आहे. अर्जुनने केबीसीमध्ये लाइफलाइनचा वापर करून १२ लाख ५० हजाराच्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं. मात्र २५ लाखांच्या प्रश्नावर त्याची गाडी गडबडली.
KBC 16 : कौन बनेगा करोडपती हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो आहे. अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये सर्वसामान्य माणसांना काही प्रश्नांची उत्तरं देऊन करोडपती होण्याची संधी मिळते. सध्या कौन बनेगा करोडपतीचा १६ वा सीझन सुरू आहे. केबीसी ज्युनियरमधील पहिला स्पर्धक हॉटसीटवर बसला आहे. अर्जुन अग्रवाल असं या स्पर्धकाचं नाव असून त्याला बुद्धिबळपट्टू आणि डॉक्टर बनायचं आहे.
हॉटसीटवर बसलेला अर्जुन सहावीत शिकत आहे. एवढ्याशा वयात त्याचं ज्ञान पाहून बिग बीदेखील आश्चर्यचकित झाले. अर्जुनने केबीसीमध्ये लाइफलाइनचा वापर करून १२ लाख ५० हजाराच्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं. मात्र २५ लाखांच्या प्रश्नावर त्याची गाडी गडबडली. १२ लाख ५० हजारांसाठी अर्जूनला "सूर्यमालेच्या एकूण वस्तुमानाच्या किती टक्के वस्तुमान सूर्यावर आहे?" असा प्रश्न विचारण्यात आला होता. यासाठी ए)५०% बी)७५% सी)५०% पेक्षा कमी डी)९९% पेक्षा जास्त असे पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी अर्जून एक्सपर्ट अनुजाची मदत घेत डी हे बरोबर उत्तर देतो.
या प्रश्नानंतर बिग बी अर्जुनला २५ लाख रुपयांसाठीचा प्रश्न विचारतात. "मारी बिस्किटचं नाव कोणत्या देशातील राजघराण्यावरुन ठेवण्यात आलं आहे", असा प्रश्न विचारला जातो. ए) इटली बी) रूस सी) मोनाको डी) फ्रांस या चार पर्यांयापैकी योग्य पर्याय अर्जूनला निवडायचा होता. त्याने ए) इटली हा पर्याय निवडला. जो चुकीचा होता. या प्रश्नाचं योग्य उत्तर बी) रूस असं होतं. त्यामुळे अर्जुनला या प्रश्नावर खेळ सोडावा लागला. केबीसीमध्ये तो १२ लाख ५० हजार रुपये जिंकला.