KBC 16: पोळ्या गोल होत नाहीत? अमिताभ बच्चन यांनी सांगितली ट्रिक, शेफ संजीव कपूरही झाले खूश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 06:52 PM2024-11-12T18:52:38+5:302024-11-12T18:52:58+5:30
केबीसीच्या या हॉटसीटवर महाराष्ट्रातील हिंगोलीमधील उत्कर्ष वासुदेव मुळे बसला आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन उत्कर्षला पोळ्या गोल करण्यासाठी खास ट्रिक सांगताना दिसत आहेत.
'कौन बनेगा करोडपती १६' मध्ये सध्या ज्युनियर्स वीक सुरू आहे. छोटे स्पर्धक हॉट सीटवर बसून त्यांच्या तल्लख बुद्धीने प्रेक्षकांबरोबरच अमिताभ बच्चन यांना आश्चर्यचकित करत आहेत. केबीसीच्या या हॉटसीटवर महाराष्ट्रातील हिंगोलीमधील उत्कर्ष वासुदेव मुळे बसला आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन उत्कर्षला पोळ्या गोल करण्यासाठी खास ट्रिक सांगताना दिसत आहेत.
उत्कर्ष हा शेफ संजीव कपूर यांचा खूप मोठा चाहता आहे. त्याला मोठं होऊन संजीव कपूर यांच्यासारखंच शेफ व्हायचं आहे. याच निमित्ताने अमिताभ बच्चन यांनी केबीसीमध्ये सहभागी झालेल्या या छोट्या स्पर्धकाची संजीव कपूर यांच्याबरोबर व्हिडिओ कॉलद्वारे बातचीत करून दिली. संजीव कपूर यांना बघून उत्कर्ष खूश झाल्याचं दिसत आहे. त्यानंतर उत्कर्ष संजीव कपूर यांच्याकडून काही कुकिंग टिप्स घेत असल्याचं दिसत आहे.
उत्कर्ष संजीव कपूर यांना विचारतो की "चवीनुसार मीठ म्हणजे नेमकं किती मीठ घालायचं?". यावर संजीव कपूर म्हणतात, "म्हणून मी आता चवीनुसार नाही तर सेहतनुसार मीठ असं म्हणतो". त्यानंतर उत्कर्ष त्यांना "पोळी गोल कशी लाटायची?" असा प्रश्न विचारतो. त्यावर संजीव कपूर यांच्याआधी अमिताभ बच्चन उत्तर देतात. ते म्हणतात, "याचं उत्तर मी देतो. पीठ पसरवायचं आणि त्यावर गोल वाटी ठेवायची...मग पोळी गोल बनते". अमिताभ बच्चन यांच्या या ट्रिकने शेफ संजीव कपूरही हसत हसल्याचं व्हिडिओत दिसत आहे.