KBC: केबीसीच्या सेटवर अमिताभ संतापले, खुर्ची सोडून निघून गेले; प्रेक्षकांमध्ये सन्नाटा; कतरिनाच्या चेहऱ्याचा रंग उडाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 15:33 IST2021-11-08T15:30:16+5:302021-11-08T15:33:39+5:30
अमिताभ बच्चन यांचं रौद्र रुप पाहून सेटवर सन्नाटा; कतरिना कैफ झाली रडवेली

KBC: केबीसीच्या सेटवर अमिताभ संतापले, खुर्ची सोडून निघून गेले; प्रेक्षकांमध्ये सन्नाटा; कतरिनाच्या चेहऱ्याचा रंग उडाला
मुंबई: कौन बनेगा करोडपती कार्यक्रमानं अनेकांची स्वप्नं साकार झाली. महानायक अमिताभ बच्चन यांना भेटण्याची आणि करोडपती होण्याची संधी मिळाली. आतापर्यंत शेकडो जणांनी अमिताभ यांच्यासमोर नशीब आजमावलं. अमिताभ यांच्या भेटीनं अनेकजण भावुक झाले. कधीकधी अमिताभही भावुक झालेले पाहायला मिळाले. मात्र नुकताच अमिताभ यांचा वेगळाच अवतार प्रेक्षकांनी अनुभवला. त्यावेळी सेटवर भयाण शांतता पसरली.
कौन बनेगा करोडपतीच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये अक्षय कुमार, कतरिता कैफ आणि रोहिथ शेट्टी सहभागी झाले होते. सूर्यवंशी चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी तिघेही केबीसीमध्ये आले होते. अक्षय कुमार आणि कतरिता अमिताभ यांच्या समोर बसून प्रश्नांचा सामना करत होते.
खेळात चीटिंग होत असल्याचं अमिताभ बच्चन यांना वाटलं. त्यांनी याबद्दल आक्षेप नोंदवला. ते नाराज झाले. २१ वर्षांच्या इतिहासात अमिताभ यांनी खुर्ची सोडली आणि तिथून निघून गेले. त्यानंतर सेटवर शांतता पसरली. प्रेक्षक एकमेकांकडे पाहत होते.
रोहित शेट्टींनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. ते एका क्रू मेंबरसोबत सेटच्या मागे गेले. त्यानंतर त्यांनी अक्षय कुमारलादेखील मागे बोलावून घेतलं. यावेळी हॉट सीटवर कतरिना एकटीच बसली होती. तिचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. केबीसीमध्ये पहिल्यांदाच असं घडल्याचं अक्षय आणि रोहित यांनी कतरिनाला सांगितलं.
अमिताभ सेट सोडून गेल्यानं कतरिनाचा चेहरा रडवेला झाला. आता पुढे काय होणार याची चिंता तिला लागून राहिली होती. तितक्यात अमिताभ आणि अक्षय कुमार सेटच्या मागून हसत हसत हॉट सीटकडे आले. अमिताभ आणि अक्षय कुमारनं आपली चेष्टा केल्याचं कतरिनाच्या लक्षात आलं आणि सेटवरील तणाव निवळला.