'आदिपुरुष पाहिला नाही पण...' केतकी चितळेची पोस्ट चर्चेत; म्हणाली, "शिवभक्त ब्राम्हण श्रीरावण..."
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 12:12 PM2023-06-18T12:12:30+5:302023-06-18T12:17:18+5:30
'रावण एक शिवभक्त ब्राह्मण होते ज्यांनी सौराष्ट्रातील सोमनाथ मंदीर बांधले होते.
सध्या सगळीकडेच 'आदिपुरुष' सिनेमाची चर्चा आहे. रामायणावर आधारित सिनेमा प्रचंड ट्रोल होतोय. व्हीएफएक्स असो किंवा संवाद काहीच धड जमलं नसल्याची टीका केली जातेय. प्रेक्षकांसोबतच अनेक कलाकारांनीही सिनेमावर प्रतिक्रिया दिली आहे. यात नेहमी कॉन्ट्रोव्हर्सीमुळे चर्चेत असलेली मराठी अभिनेत्री केतकी चितळेनेही (Ketaki Chitale) आता प्रतिक्रिया दिली आहे . यात तिने रावण ब्राम्हण असून त्याचा श्री असा उल्लेखही केला आहे.
काय म्हणाली केतकी?
केतकी चितळेने पोस्ट करत लिहिले, 'बऱ्याच लोकांनी मला विचारले की माझे आदिपुरुष या सिनेमा विषयी काय मत आहे. माझे मत: मी बघितलेला नाही त्यामुळे मी त्यावर बोलू शकत नाही. पण ज्या चित्रपटाच्या टीझरमध्ये शिवभक्त रावण रुद्राक्ष तोडणार असेल तर मी तो चित्रपट बघणारही नाही.'
'रावण एक शिवभक्त ब्राह्मण होते ज्यांनी सौराष्ट्रातील सोमनाथ मंदीर बांधले होते. सोमनाथ मंदिर अनेक वेळा पडले आहे आणि बऱ्याच राजांनी आणि एका राणीने ते पुन्हा बांधले आहे. त्यापैकी एक श्री रावणही आहेत. रामायण हा घडलेला इतिहास आहे, फिरंगांनी ठरवलेले मिथ्य नाही. पुरावे आहेत रामायणाचे. नवी पिढी मूर्ख नाही की जे त्यांच्या नावावर बिल फाडून सारवासारव करणे चालू शकेल.'
केतकीच्या या पोस्टवर प्रतिक्रिया येत आहेत. रावण हा शिवभक्त होता हे खरंच आहे पण त्याचा श्री रावण असा उल्लेख नेटकऱ्यांना पटलेला नाही. 'केतकी तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, तुझ्याबद्दलचा आदर काहीसा कमी झाला' अशा कमेंट तिच्या पोस्टवर आल्या आहेत.