खंडेरावाची भूमिका हाच सर्वात मोठा पुरस्कार आहे - गौरव अमलानी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 07:25 PM2022-12-01T19:25:21+5:302022-12-01T19:26:15+5:30

Gaurav Amlani : पुण्यश्लोक अहिल्याबाईमध्ये खंडेराव होळकर यांची भूमिका करणारा गौरव अमलानीने साकारली आहे,

Khanderao's role is the biggest award - Gaurav Amlani | खंडेरावाची भूमिका हाच सर्वात मोठा पुरस्कार आहे - गौरव अमलानी

खंडेरावाची भूमिका हाच सर्वात मोठा पुरस्कार आहे - गौरव अमलानी

googlenewsNext

पुण्यश्लोक अहिल्याबाई (Punyashlok Ahilyabai) या मालिकेत सादर होणार्‍या महान साम्राज्ञी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रेरणादायक कथानकाने प्रेक्षकांना पहिल्यापासून खिळवून ठेवले आहे. या मालिकेत अशा एका कणखर स्त्रीची कहाणी विशद करण्यात आली आहे, जिने आपले सासरे मल्हारराव होळकर (राजेश शृंगारपुरे) यांच्या खंबीर पाठिंब्याच्या आधारे समाजातील अनिष्ट रुढींचा विरोध केला आणि आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचले. आपल्या प्रजाहिताच्या उदात्त कार्यामधून अहिल्या बाईंनी (एतशा संझगिरी) हे उदाहरण घालून दिले की, मनुष्य जन्माने नाही, तर आपल्या कर्तृत्त्वाने मोठा होत असतो. सध्याच्या कथानकात अहिल्याबाईच्या जीवनातील आणखी एक अध्याय प्रेक्षकांसमोर येत आहे. कुम्हेरच्या युद्धात खांडेरावाला (गौरव अमलानी) तिने कशी साथ दिली, सल्ला दिला याचे चित्रण यात आहे.
 
खंडेराव एक सक्षम मुलगा आणि महान योद्धा होता, त्याच्या शौर्याच्या गाथा प्रसिद्ध आहेत. कुम्हेरच्या युद्धात त्याने हे सिद्ध केले की, तो एक महान योद्धा आणि नेता आहे. या युद्धात त्याचे धैर्य आणि रणनीतीचा विचार करणारी बुद्धिमत्ता याची चुणूक बघायला मिळाली. आगामी भागांमध्ये प्रेक्षक बघातील की, खंडेराव युद्धाची तयारी कशी करतो, सुरजमलशी युद्ध करण्यासाठी किल्ल्याच्या बाजूने एक भुयारी रस्ता खोदण्याची योजना कशी आखतो. मल्हारराव आणि अहिल्या त्याच्या या योजनेला पाठिंबा देतात, त्याच्या बाजूने खंबीर उभे राहतात आणि त्याचा आत्मविश्वास वाढवतात.


 
या कथानकाबाबत आणि खंडेराव ही महत्त्वाची भूमिका करत असल्याबाबत आपले विचार व्यक्त करताना गौरव अमलानी म्हणाला, “इतके महान आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्व साकारण्याची संधी कारकिर्दीत फार कमी लोकांना मिळते. मला ती संधी मिळाली हे मी माझे भाग्य मानतो. मला खंडेरावाची भूमिका करायला मिळाली, ज्याच्या व्यक्तिमत्त्वात अनेक पदर आहेत. लोक त्याचे गुण-अवगुण समजू शकतात. त्याचे वेगळेपण, त्याची कमजोरी आणि त्याच्या भावना देखील. एका तरुण राजकुमारापासून ते प्रेमळ पतीपर्यंत आणि पित्यापासून ते योद्ध्यापर्यंत खंडेराव होळकर यांचा प्रवास थक्क करणारा आहे आणि त्यांच्या कर्तृत्त्वाचे गोडवे आजदेखील गाईले जातात.

खंडेरावाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले, पण वडील मल्हारराव आणि पत्नी अहिल्याबाई यांनी ज्या प्रकारे त्याला साथ दिली, आधार दिला ते कौतुकास्पद आहे. त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या युद्धात त्याचे वडील आणि अहिल्या पुन्हा त्याच्या पाठीशी कसे उभे राहतात हे सूरजमलशी झालेल्या कुम्हेरच्या लढाईत प्रेक्षकांना पुन्हा दिसून येईल. हे दृश्य या मालिकेत देखील अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, कारण इथून अहिल्येच्या जीवनातील एक नवा अध्याय सुरू होणार आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि अखेरच्या युद्धासाठी खंडेराव जेव्हा सर्वांचा निरोप घेतो, तो क्षण माझ्यासाठी खूप भावनिक आणि आव्हानात्मक होता, कारण त्यात अनेक भाव-भावनांचा कल्लोळ होता. आणि आत्तापर्यंतच्या अनेक कथानकांपैकी ही मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट आहे. मला वाटते या भूमिकेला जे प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे, त्यावर पहिला हक्क खंडेरावाचा आहे आणि त्यानंतर माझा. खंडेरावाची भूमिका साकारण्याचा अनुभव मला समृद्ध करणारा होता. त्यामुळे, या एकाच वर्षात मी अभिनेता म्हणून खूप वाढलो असे मला वाटते. मला मिळालेला हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. प्रेक्षक, निर्माते आणि माझ्या नियतीला शतशः धन्यवाद, की हे असे घडले, असे गौरव म्हणाला.

Web Title: Khanderao's role is the biggest award - Gaurav Amlani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.