खतरों के खिलाडी ९ चा विजेता पुनित पाठकने यांचे मानले विशेष आभार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 01:10 PM2019-03-11T13:10:05+5:302019-03-11T13:12:28+5:30
खतरों के खिलाडी या कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासूनच पुनितला या कार्यक्रमाच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. कारण पुनितने त्याचे सगळेच स्टंट खूपच चांगले आणि कमी वेळात केले होते आणि विशेष म्हणजे संपूर्ण सिझनमध्ये त्याला एकदाच एलिमिनेशन स्टंट करावा लागला होता.
खतरों के खिलाडी या कार्यक्रमाच्या नवव्या सिझनने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. या कार्यक्रमातील प्रत्येक स्टंट हे अतिशय भयानक होते. पण स्पर्धकांनी ते खूपच चांगल्या प्रकारे पूर्ण केले. या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीत शमिता शेट्टी, अली गोनी, आदित्य नारायण, पुनित पाठक, रिधिमा पंडीत यांनी मजल मारली. पण शेवटच्या दिवशी शमिता आणि अली यांना या कार्यक्रमातून बाहेर पडावे लागले आणि अंतिम सामना पुनित, आदित्य आणि रिधिमा यांच्यात रंगला.
खतरों के खिलाडी ९ या कार्यक्रमातील फायनलचा स्टंट हा आतापर्यंतच्या सगळ्या स्टंटपेक्षा भयानक होता आणि विशेष म्हणजे हा स्टंट या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आणि प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीने स्वतः डिझाईन केला होता. या स्टंटमध्ये वेग आणि उंची यांचे कॉम्बिनेशन होते. या स्टंटमध्ये कार, ट्रक आणि हेलिकॉप्टर यांचा वापर करण्यात आला होता. हा स्टंट तिन्ही स्पर्धकांनी सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न केला. पण पुनितने हा स्टंट कमी वेळात करत या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवले.
खतरों के खिलाडी या कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासूनच पुनितला या कार्यक्रमाच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. कारण पुनितने त्याचे सगळेच स्टंट खूपच चांगले आणि कमी वेळात केले होते आणि विशेष म्हणजे संपूर्ण सिझनमध्ये त्याला एकदाच एलिमिनेशन स्टंट करावा लागला होता.
खतरों के खिलाडी ९ या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळाल्याबद्दल पुनितला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. या कार्यक्रमाचा विजेता झाल्याबद्दल त्याला एक ट्रॉफी आणि गाडी भेट म्हणून देण्यात आली. पुनित त्याच्या या विजयाबद्दल सांगतो, मी घेतलेल्या मेहनतीमुळेच मला हे यश मिळवता आले. खतरों के खिलाडी या कार्यक्रमाचा मी विजेता झालो, याचा मला प्रचंड आनंद होत आहे. या कार्यक्रमामुळे मला माझ्या मनात असलेल्या भीतीवर मात करता आली आणि माझ्यातील आत्मविश्वास वाढला. मी या विजयासाठी रोहित शेट्टी आणि या कार्यक्रमातील माझ्या सगळ्या स्पर्धकांचे आभार मानतो.