'आम्ही सारे खवय्ये'मध्ये आता येणार छोटे शेफ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 18:00 IST2018-12-19T18:00:00+5:302018-12-19T18:00:02+5:30
आम्ही सारे खवय्येचा हा लज्जतदार प्रवास नुकताच ३००० भागांचा झाला. आता या कार्यक्रमात सुगरणी नाही तर छोटे शेफ येणार आहेत.

'आम्ही सारे खवय्ये'मध्ये आता येणार छोटे शेफ
स्वयंपाक करण्याची आवड अनेकांना असते. स्वयंपाक करणे ही एक कला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. पण ही कला अनेकांना सगळ्यांसमोर आणता येत नाही. पण हीच कला सगळ्यांसमोर सादर करण्याची संधी एका कार्यक्रमामुळे छोट्या चिमुकल्यांना मिळणार आहे. आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. याच कार्यक्रमात आता छोट्या शेफना संधी दिली जाणार आहे.
असं म्हणतात की, माणसाच्या हृदयाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो. त्यामुळे चमचमीत पदार्थांनी सगळ्यांना तृप्त करण्याच्या प्रयत्नात गृहिणी असतात. रोज रोज नवीन आणि वेगळं काय करायचं? यासाठी त्या विविध माध्यमं शोधत असतात. या सुगरणींची मदत झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'आम्ही सारे खवय्ये' नित्यनियमाने करत आहे. आम्ही सारे खवय्येचा हा लज्जतदार प्रवास नुकताच ३००० भागांचा झाला. आता या कार्यक्रमात सुगरणी नाही तर छोटे शेफ येणार आहेत.
पूर्वी मुलं मैदानी खेळ खेळायचे, पण आत्ताच्या पिढीला मैदानी खेळांपेक्षा व्हिडीओ आणि मोबाईल गेम्समध्ये रुची असते. आजची मुलं खूप अनेक गोष्टींमध्ये निपुण असतात आणि अशीच काही मुलं आम्ही सारे खवय्येमध्ये त्यांचं पाक कौशल्य दाखवणार आहेत. आम्ही सारे खवय्ये कार्यक्रमाच्या किचनमध्ये छोट्या शेफचं स्वागत पुढील आठवड्यापासून होणार आहे. हे छोटे शेफ संकर्षण सोबत त्यांच्या आवडी-निवडींबद्दल गप्पा मारणार आहेत. तसेच त्यांना आवडणारे चमचमीत पदार्थ बनवणार आहेत. तेव्हा या छोट्या शेफना आणि त्यांच्या बनवलेल्या खमंग रेसिपीजना प्रेक्षकांना २४ डिसेंबर पासून आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात सोमवार ते शनिवार दुपारी १.३० वाजता फक्त झी मराठी वर पाहायला मिळणार आहे.
आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम गेली अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले जातात. आता हा चिमुकल्यांचा शेफ बनण्याचा प्रवास देखील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची खात्री या कार्यक्रमाच्या टीमला आहे.