Kiran Mane controversy : अशा प्रवृत्तीला आमच्या हद्दीत प्रवेश नाही...; गुळुंब ग्रामपंचायतीचा ‘मुलगी झाली हो’ला ‘दे धक्का’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 11:04 AM2022-01-16T11:04:04+5:302022-01-16T11:04:57+5:30
Kiran Mane controversy : किरण माने प्रकरण; गुळुंब गावच्या सरपंच स्वाती शिवाजी माने यांची रोखठोक भूमिका
राजकीय भूमिका मांडली म्हणून ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेतील अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना मालिकेतून काढून टाकण्यात आलं. या प्रकरणानंतर स्टार प्रवाह वाहिनी (Star Pravah)आणि ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या निर्मात्यांवर चौफेर टीका होतेय. राजकीय नेत्यांपासून कलाकरांपर्यंत अनेकांनी या प्रकरणात किरण मानेंना पाठींबा देत, स्टार प्रवाह आणि ‘मुलगी झाली हो’च्या निर्मात्यांवर रोष व्यक्त केला आहे. अशात गुळुंब गावाच्या ग्रामपंचायतीने देखील किरण मानेंना पाठींबा देत, ‘मुलगी झाली हो’च्या चित्रीकरणास परवानगी नाकारली आहे.
‘मुलगी झाली हो’ या मालिकेचं सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील गुळुंब गावात चित्रिकरण सुरु आहे. पण किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर गुळुंब गावाच्या सरपंच स्वाती शिवाजी माने यांनी स्टार प्रवाह वाहिनी आणि ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या निर्मात्यांना एक पत्र पाठवत, या प्रकाराचा निषेध केला आहे.
‘राजकीय भूमिका मांडणाऱ्या मराठी कलावंताला मालिकेतून काढल्याबद्दल मराठी चित्रपटसृष्टीचा जाहीर निषेध! अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कुऱ्हाड चालवणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनी आणि मुलगी झाली हो या मालिकेची संपूर्ण टीमने हे विसरु नये की, महाराष्ट्रात अजनूही शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर लोकशाही नांदते. अशा मनुवादी विचारसरणीच्या स्टार प्रवाह वाहिनी आणि मुलगी झाली हो मालिकेच्या टीमचे आमच्या गावी होत असलेल्या चित्रीकरणाला ग्रामपंचायत गुळुंब तालुका वाई जिल्हा सातारा मान्यता नाकारत आहे. अशा प्रवृत्तीला इथून पुढे आमच्या हद्दीत प्रवेश नाही,’असं पत्र गुळुंब गावच्या सरपंच स्वाती शिवाजी माने यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
मालिकेतून काढून टाकल्यानंतर किरण माने यांनी काल पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली होती. हे माझ्यासाठी सुद्धा धक्कादायक आहे. मालिकेच्या सेटवरुन गेल्यांनतर मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे. सोशल मीडियावर मी जे काही व्यक्त झालो तो किरण माने वेगळा आहे. राजकीय भूमिका मांडणे हे माझे व्यक्तीगत विचार आहेत. तो माझा हक्क आहे. मी घरात काय खातो, मी बाहेर काय बोलतो, कपडे काय घालतो, यावर कुणीही बंधन ठेवू नये. ही लोकशाही आहे, हा काही अफगानिस्तान नाही, पाकिस्तान नाही. हा भारत आहे, असं माने म्हणाले होते.