...म्हणून किरण मानेंना मालिकेतून काढलं; अखेर वाहिनीनं कारण सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 08:18 AM2022-01-17T08:18:11+5:302022-01-17T08:18:57+5:30

स्टार प्रवाह वाहिनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील यांची व्यक्तिरेखा साकारणारे किरण माने यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत.

Kiran Mane removed from Mulgi Zali Ho for abusive behaviour clarifies TV channel | ...म्हणून किरण मानेंना मालिकेतून काढलं; अखेर वाहिनीनं कारण सांगितलं

...म्हणून किरण मानेंना मालिकेतून काढलं; अखेर वाहिनीनं कारण सांगितलं

googlenewsNext

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेता किरण माने प्रकरणाबाबत वाहिनीने मौन सोडले आहे. राजकीय भूमिका घेतल्याने नव्हे, तर मानेंकडून इतर कलाकारांसोबत गैरवर्तणूक सुरू असल्याने कारवाई केल्याचे स्पष्टीकरण वाहिनीने दिले.

स्टार प्रवाह वाहिनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटील यांची व्यक्तिरेखा साकारणारे किरण माने यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. या मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, माने यांना शोमधून काढून टाकण्याचा निर्णय त्यांनी अनेक सह-कलाकारांसोबत, विशेषतः महिला नायिकेसोबत केलेल्या गैरवर्तनामुळे घेतला. सहकलाकार, दिग्दर्शक यांचा ते अनादर करायचे. याबाबत अनेक तक्रारी आल्या. त्यानंतर त्यांना समज देण्यात आली. पण, त्यांच्या वर्तनात बदल झाला नाही. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करतो. पण त्यासोबतच आमच्या कलाकारांना, विशेषतः महिलांना एक सुरक्षित कार्यक्षेत्र देण्यास कटिबद्ध आहोत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

 मानेंची नवी पोस्ट चर्चेत
किरण मानेंनी रविवारी फेसबुक पोस्ट करत निर्मात्यांवर शरसंधान साधले. ‘आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्राॅडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू... मीडियावाले सेटवर जाणार आहेत... अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली आहे... ते बिचारे पोटार्थी हायेत. प्रोडक्शन हाऊस विरोधात बोलणे त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखे काढून टाकले जाईल म्हणून हादरलेत बिचारे... चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत.. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावे लागणार.. तरीही ज्यांच्या कणा मजबूत आहे, ते सत्य सांगतीलच! पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर इस्वास ठेऊ नका. मी बी कंबर कसलेली हाय... कच्च्या गुरूचा चेला नाय मी!, ही पोस्ट चर्चेत आहे.

काढणे अयोग्यच - सासणे
ठाणे : राजकीय भूमिका मांडली म्हणून अभिनेता किरण माने यांना मालिकेतून काढणे हे योग्य नाही. त्यांनी आपल्या भूमिकेत कोणते शब्द मांडले हे संबंधितांनी तपासले असेलच, परंतु त्यासाठी कलाकाराला नारळ देणे चुकीचेच आहे, असे मत ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासणे यांनी रविवारी ठाण्यात व्यक्त केले. 

योग्य वेळी भूमिका घेऊ - मनसे
किरण यांच्या म्हणण्यानुसार, राजकीय भूमिका घेतल्याने त्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता मालिकेतून बाहेर केले गेले. यावर कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. राजकीय भूमिकेमुळे नव्हे तर त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. या सगळ्यावर योग्यवेळी मनसे आपली भूमिका मांडेन, असे अमेय खोपकर यांनी एका वहिनीला प्रतिक्रिया देताना सांगितले.

Web Title: Kiran Mane removed from Mulgi Zali Ho for abusive behaviour clarifies TV channel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.