पोंक्षे, गोखले, कंगना यांना एक न्याय अन् किरण मानेंना वेगळा का?..; सोशल मीडियावर अभिनेत्याला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 10:37 AM2022-01-14T10:37:01+5:302022-01-14T10:37:53+5:30
Kiran Mane: राजकीय भूमिका घेतल्यानं किरण मानेंना 'मुलगी झाली हो' मालिकेतून काढलं, यानंतर #istandwith_KiranMane हा हॅशटॅग सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Jhali Ho) या लोकप्रिय मालिकेचे अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांच्या सोशल मीडिया पोस्ट चांगल्याच चर्चेत असतात. मात्र एक राजकीय पोस्ट नडली आणि त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यानंतर अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अनेकांनी वाहिनीने केलेल्या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सोशल मीडियावर लोकांनी किरण मानेंना जाहिर पाठींबा देत #ISupportKiranMane ही मोहिम सुरू केली आहे. ‘संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे. कारण तुम्ही सर्वांच्या मनात आहात,’ अशा शब्दांत लोकांनी किरण मानेंना पाठींबा दिला आहे. अनेकांनी स्टार प्रवाह वाहिनीवर बहिष्कार टाकण्याची मागणीही केली आहे.
‘दादा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. या देशात मुस्कटदाबी सुरू आहे. अजून लय दिसं नाय चालायचं खेळ. लवकरच खल्लास होईल. काम बंद करतील, आवाज नाही,’अशी प्रतिक्रिया भीमराव धुलप नावाच्या युजरने दिली आहे.
‘काळजी करू नका. कोणतीही वेळ कायमस्वरूपी राहत नाही आणि सूर्याला कुणी झाकू शकत नाही. पण एक कळले काही चॅनल हे मनुवादी आणि दबलेले आहेत, ’अशी कमेंट योगेश केदार नावाच्या युजरने केली आहे.
‘किरण माने यांच्यासारख्या कलाकाराला मालिकेतून काढून टाकले जाते. त्यांची रोजी रोटी हिसकावून घेतली जाते. या प्रवृत्तीला कडाडून विरोध झाला पाहिजे,’ अशा शब्दांत एका युजरने किरण मानेंना आपला पाठींबा दिला आहे.
‘पोंक्षे, गोखले, कंगना यांना वेगळा न्याय अन् किरण माने यांना वेगळा?’, अशा शब्दांत एका युजरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काय आहे प्रकरण
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ मालिकेत अभिनेता किरण माने हे विलास पाटील ही भूमिका साकारत होते. किरण हे सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहेत. वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. याचदरम्यान किरण यांना स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अचानक काढण्यात आलं. राजकीय भूमिका मांडल्यामुळे आपल्याला मालिकेतून बाहेर काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
माझ्या राजकीय भूमिकेमुळे मला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढण्यात आलं असल्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं. त्यानंतर किरण यांनी सोशल मीडियावर ‘काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा... गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा ’,अशा आशयाची पोस्ट केली. त्यांच्या या पोस्टवर किरण माने यांच्या अनेक चाहत्यांनी आयस्टँड व्हिथ किरण माने असा हॅशटॅग वापरून किरण माने यांना पाठिंबा दर्शवला आहे.