एका मुस्लिम राजाने बांधलेलं महाराष्ट्रातील एकमेव मंदिर कोणतं माहितेय? अभिनेत्याची पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 14:34 IST2025-03-10T14:33:48+5:302025-03-10T14:34:01+5:30

या मंदिराला कळस नाही तर गोल घुमट आहे.

Kiran Mane Share Post On Narsobachi Wadi Temple History Dutta Mandir Built By Adil Shah Of Bijapur in Maharashtra | एका मुस्लिम राजाने बांधलेलं महाराष्ट्रातील एकमेव मंदिर कोणतं माहितेय? अभिनेत्याची पोस्ट!

एका मुस्लिम राजाने बांधलेलं महाराष्ट्रातील एकमेव मंदिर कोणतं माहितेय? अभिनेत्याची पोस्ट!

महाराष्ट्रात अनेक मंदिर आहेत. प्रत्येक मंदिराचा वेगळा इतिहास आहे. असेच एक अनोखे मंदिर कोल्हापुरात आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर एका मुस्लिम राजाने बांधले होते. ते मंदिर कोणते आहे तुम्हाला माहितेय? नुकतंच मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते किरण माने यांनी मुस्लिम राजाने बांधलेल्या मंदिराबद्दल पोस्ट शेअर केली आहे. 

 किरण माने यांनी पोस्ट शेअर करत महाराष्ट्रातलं महत्त्वाचं देवस्थान असलेलं लोकप्रिय नरसोबाच्या वाडीचं (Narsobachi Wadi) मंदिर हे विजापूरचा बादशाह आदिलशाह (Adilshah) यानं बांधल्याचं सांगितलं आहे. कृष्णा-पंचगंगेच्या संगमावर वसलेली नरसोबाची वाडी हे प्रसिद्ध तीर्थ क्षेत्र आहे. महाराष्ट्राच्या दत्तसंप्रदायची राजधानी म्हणूनही तिला ओळखले जाते.  या नृसिंहवाडीला दत्तमाहात्म्याचे अधिष्ठान लाभले आहे.

किरण माने यांनी पोस्ट शेअर करत लिहलं, "मी 'सिंधूताई माझी माई' मालिकेचे शूटिंग करत होतो तेव्हाची गोष्ट! सांगली भागात कृष्णा-पंचगंगेच्या संगमावर एका गावात शुटींग सुरू होतं. आमच्या युनिटमधल्या लोकांना कळालं की तिथून जवळच 'नरसोबाची वाडी' हे दत्तात्रयांचं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. आमच्यात भाविक कलाकार तंत्रज्ञ होते. त्यांनी सुट्टीच्या दिवशी जायचा प्लॅन आखला. मला लहानपणापासून मंदिरांच्या वास्तूरचना पहायचं प्रचंड आकर्षण आहे. नरसोबाच्या वाडीचं अनोखं दत्तमंदिर पाहताना मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं. मंदिराला कळस नाही. वास्तूच्या वर गोल घुमट आहे. मी पुजाऱ्याकडे याबद्दल चौकशी केल्यावर आणखी एक आनंदाश्चर्याचा धक्का बसला".

"हे मंदिर एका मुस्लिम राजानं बांधलं आहे. विजापूरचा बादशाह आदिलशाह यानं हे मंदिर खुप भक्तिभावानं उभं केलं आहे. विजापूरच्या मुस्लिम कारागिरांवर पहिल्यांदाच मंदिर बांधायचा प्रसंग आल्याने त्यांनी चुकून शिखराला घुमटासारखा आकार दिला. नकळत का होईना पण मंदिर आणि मशिदीचा विलक्षण लोभस असा मिलाफ लाभलेली वास्तू आज दिमाखात उभी आहे. असं म्हणतात, आदिलशाहच्या मुलीला दृष्टीदोष झाला होता. लाडक्या लेकीची दृष्टी पुर्ववत व्हावी म्हणून त्यानं दत्ताला नवस केला. मुलगी बरी झाल्यावर त्यानं हे मंदिर बांधून नवस फेडला".


"आज नरसोबाची वाडी ही दत्त महाराजांची राजधानी म्हणून म्हणून ओळखली जाते. जगभरातल्या असंख्य हिंदू भाविकांचे हे श्रद्धास्थान आहेच. पण, इथला अभूतपूर्व दत्तजयंती सोहळा पहायला कर्नाटक, आंध्रातून अनेक मुस्लिम भाविकही येतात. बाराही महिने दर्शनाला गर्दी असते. काल छ. शाहूंनी बांधलेल्या मशिदीबद्दल मी केलेली पोस्ट, एका ट्रोलला स्वच्छ नजरेने पहाता येत नव्हती. त्याला द्वेषभावनेच्या व्हायरसमुळे दृष्टिदोष झाला होता. तो मला कुत्सितपणे म्हणाला, "संपूर्ण पृथ्वीवर मुस्लिम बादशाह किंवा सरदराने आनंदाने एखादं मंदिर बांधल्याचं उदाहरण तुम्हाला नाही सापडणार"…मी ओळखलं, याची दूषित झालेली नजर फक्त नरसोबाच्या वाडीचं दत्तमंदिर स्वच्छ करू शकतं.  मस्जिद-मंदिर का झगड़ा यूँ मिटाना चाहिए…इस ज़मीं पर ‘प्यार’ का इक घर बनाना चाहिए ! मज़हबों में क्या लिखा है? ये बताना चाहिए, उस को गीता… और उसे कुरआँ पढ़ाना चाहिए, असं पोस्टच्या शेवटी किरण माने यांनी म्हटलं.

Web Title: Kiran Mane Share Post On Narsobachi Wadi Temple History Dutta Mandir Built By Adil Shah Of Bijapur in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.