"छातीचा पिंजरा दिसत होता, पण...", किरण मानेंची पोस्ट चर्चेत, म्हणाले, "गोळ्या घालून मारला बाबाला, तरीही..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 03:31 PM2023-10-02T15:31:49+5:302023-10-02T15:32:08+5:30
किरण मानेंनी गांधी जयंतीनिमित्त केलेल्या पोस्टनेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
'बिग बॉस मराठी' फेम किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक घडामोडींवर ते अगदी परखडपणे भाष्य करताना दिसतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून किरण माने व्यक्त होत असतात. आपली मतं ते अनकेदा पोस्टद्वारे मांडतात. त्यांच्या पोस्ट या नेहमीच चर्चेचा विषय असतात. किरण मानेंनी गांधी जयंतीनिमित्त केलेल्या पोस्टनेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
गांधी जयंतीनिमित्त किरण मानेंची पोस्ट
माणूस दिसायला हडकुळा होता. किरकोळ शरीरयष्टी. छातीचा पिंजरा दिसत होता, पन माझ्या भावा, त्या छातीत असा दम होता की आजबी अख्खं जग त्याला झुकून सलाम करतं! ही होती फक्त विचारांची ताकद. अमेरीका-इंग्लंड-जर्मनी-कोरीया...पृथ्वीवरच्या कुटल्याबी देशात जा...कुट्ट्टंबी... आज गांधीबाबाच्या विचारांनी प्रभावित झालेली, त्यांच्या पुतळ्यापुढं नतमस्तक झालेली मानसं भेटतील !
आपन कित्तीबी वरडुन बोललो - घसा फाडूफाडून बोललो, तरी आपल्या बोलन्यात 'सत्याचा अंश' नसंल तर जगाच्या बाजारात त्या बोलन्याला घंटा किंमत मिळत नसती... त्या महात्म्याचा आवाज खनखनीत नव्हता का चालन्यात रूबाब न्हवता.. वाकून काठी टेकत-टेकत हज्जारो लोकांसमोर त्यो यायचा.. पालथी मांडी घालून बसायचा आन बसक्या आवाजात बोलत र्हायचा... आवाजात चढउतार नायत का टाळीबाज-चटपटीत वाक्य नायत... पन त्याच्या विचारात 'निर्मळ'पना व्हता - शब्दाशब्दात भारतमातेवरची माया व्हती - रक्ताच्या थेंबाथेंबात आपल्या मातीतल्या गोरगरीबांसाठीची आस व्हती - मानवतेची कास व्हती - 'सत्याची' ताकद व्हती..
गोळ्या घालुन मारला बाबाला... पन तरीबी जित्ता र्हायला.. शत्रूच्या नाकावर टिच्चून. जगातला एकबी देश असा नाय जिथं त्याचा विचार पोचला नाय.
खायचं काम नाय गड्याहो...ह्यांच्या हज्जार पिढ्या खपत्याल त्यो 'विचार' संपवायला पन 'गांधी' उसळी मारून वर येतच र्हानार. सलाम महात्म्या सलाम... कडकडीत सलाम..
किरण माने सध्या 'सिंधुताई माझी माय' या कलर्स वाहिनीवरील मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्यांनी अनेक गाजलेल्या मालिका, नाटक आणि चित्रपटांतही काम केलं आहे.