"एका लहान दलित मुलीवर अत्याचार होतो अन्.."; किरण मानेंनी 'संतोष' सिनेमाबद्दल पोस्ट लिहून व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 14:50 IST2025-04-08T14:49:34+5:302025-04-08T14:50:09+5:30
किरण मानेंनी संतोष सिनेमाबद्दल पोस्ट लिहून त्यांच्या मनातील खंत व्यक्त केली आहे (kiran mane, santosh)

"एका लहान दलित मुलीवर अत्याचार होतो अन्.."; किरण मानेंनी 'संतोष' सिनेमाबद्दल पोस्ट लिहून व्यक्त केली खंत
किरण माने सोशल मीडियावर विविध विषयांवर पोस्ट लिहित असतात. नुकतंच किरण मानेंनी सध्या जगभर ज्या सिनेमाची चर्चा आहे त्या ‘संतोष’ सिनेमाविषयी पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट लिहून किरण मानेंनी या सिनेमाच्या निमित्ताने भारतीय समाजव्यवस्थेविषयी खंत व्यक्त केलीय. किरण माने लिहितात, "संतोष नावाच्या एका हिंदी सिनेमानं जगभरात हलचल निर्माण केलीय भावांनो... कानपासून ऑस्करमधल्या एन्ट्रीपर्यन्त चर्चा सुरू आहे... पण भारतात मात्र तुम्ही आम्ही पाहू शकत नाही. आहे की नाही गंमत?"
"एका लहान दलित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेभोवती फिरणारा हा सिनेमा ब्रिटन, युरोप, अमेरिकेतल्या प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलाय... पण भारतीय सेन्सॉर बोर्डानं मात्र त्या सिनेमाच्या प्रदर्शनात अडचण निर्माण केलीय. कारण काय? तर या सिनेमात, आपल्या भारतीय व्यवस्थेत दलित आणि मुस्लिम समाजाचं कसं छुपं शोषण केलं जातं याचं भेदक वास्तव उलगडून दाखवलं आहे."
"जनमत पाठीशी नसताना झोलझाल करून सत्तेत बसलेले हुकूमशहा सगळ्यात जास्त कुणाला घाबरत असतील तर सत्यशोधक, निर्भिड कलाकारांच्या आवाजाला. हिटलरपासून मुसोलिनीपर्यन्तची उदाहरणं आहेत इतिहासात. आपल्याकडं हल्ली तर साधे स्टॅंडअप कॉमेडियन्ससुद्धा सत्ताधार्यांच्या बुडाला आग लावताना पहातोय आपण. “कोण नामदेव ढसाळ? आम्हाला माहिती नाही” असं म्हणत नामदेव ढसाळांची कविता सिनेमातून काढून टाकायला लावण्याचा निर्लज्ज भेकडपणा बघतोय... हा तर ऑस्करमध्ये जगभरातल्या सगळ्या देशांमधल्या सिनेमांना तगडी टक्कर देणारा सिनेमा ! डरना तो ज़रूरी है मेरे भाई."
"शाहाना गोस्वामी या अत्यंत प्रतिभावान अभिनेत्रीची प्रमुख भुमिका असलेला हा चित्रपट संध्या सूरी या दिग्दर्शिकेनं दिग्दर्शित केला आहे. ‘संतोष’ नांवाच्या महिलेभोवती फिरणारं हे कथानक. पोलीसमध्ये नोकरीला असलेला तिचा नवरा दंगलीत मारला जातो आणि त्याच्या जागेवर तिला भरती करून घेतलं जातं. तिच्याकडं पहिलीच केस येते एका अल्पवयीन दलित मुलीच्या अपहरणाची... ज्या मुलीवर बलात्कार होऊन तिचा खुन झाल्याचं सिद्ध होतं... या तपासाची ही खुर्चीला खिळवून ठेवणारी कहाणी आहे."
"आपल्या वर्तमान व्यवस्थेत दलित आणि मुस्लीमांबद्दल आकस धरून कसं शोषण केलं जातं याचं अतिशय प्रभावी चित्रण असलेल्या या सिनेमानं जगात खळबळ माजवलीय. ‘भारतीय समाजव्यवस्थेचा आवाज’ असा चारीबाजूंनी गुणगौरव होतोय... पण आपल्या देशात मात्र हाच आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. भारतीय संविधानाबद्दल आस्था असणार्या या मातीतल्या मूलनिवासी माणसा... अजून तरी होय जागा । तुका म्हणे पुढे दगा ।।"