'तू भेटशी नव्याने' मालिकेत किशोरी आंबिये वेगळ्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 01:20 PM2024-07-20T13:20:10+5:302024-07-20T13:20:41+5:30
Kishori Ambiye : कधी खाष्ट, कधी प्रेमळ, तर कधी विनोदी, कधी गंभीर अशा विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री किशोरी आंबिये सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत एका नव्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.
कधी खाष्ट, कधी प्रेमळ, तर कधी विनोदी, कधी गंभीर अशा विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री किशोरी आंबिये (Kishori Ambiye) सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत एका नव्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. यात त्यांनी कॉलेजच्या प्राध्यापिकेची भूमिका साकारली आहे. पद्मिनी गाडगीळ असं या व्यक्तिरेखेचं नाव आहे. आजवरच्या त्यांच्या भूमिकांपेक्षा अगदी वेगळी व्यक्तिरेखा यात साकारत आहेत.
मालिका विश्वात एआयवर आधारित असलेली ‘तू भेटशी नव्याने’ ही जगभरातली पहिलीच मालिका आहे. प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी ही नवीकोरी गोष्ट दोन काळांत वेगळ्या शैलीत दिसणार आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत. सहनिर्माते संदीप जाधव आहेत. या मालिकेत किशोरी आंबिये यांचे दोन ट्रॅक असून त्यांच्या नव्या व्यक्तिरेखेमुळे मालिकेत काय वळण येणार? हे बघणं उत्सुकतेचे ठरणार आहे. दोन काळातल्या व्यक्तिरेखा त्या यात साकारत असून प्राध्यापिकेच्या भूमिकेनंतर नव्या ट्रॅकमध्ये त्या कोणत्या रूपात दिसणार? आणि त्यांच्या येण्याने अभिमन्यू आणि तन्वीच्या आयुष्यात काय होणार ? की त्यांच्या येण्याने या दोघांचे बंध जुळले जाणार? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
चांगल्या विषयामुळे आणि भूमिकेमुळे मी या मालिकेला होकार दिला. मैत्री आणि प्रेम या प्रवासात वळणावळणावर घडणाऱ्या अनपेक्षित गोष्टी, याचा रंजक अनुभव देणारी ही मालिका आहे. 'तू भेटशी नव्याने' मालिकेच्या निमित्ताने दोन वेगळ्या काळातील भूमिका करताना खूप मजा येत असल्याचे किशोरी आंबिये' सांगतात.