‘माझा होशील ना’मधील ‘बंधू मामा’चा लेकही आहे अभिनेता, दिसतो फारच हॅण्डसम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 08:00 AM2021-08-08T08:00:00+5:302021-08-08T08:00:06+5:30
‘माझा होशील ना’ ( Majha Hoshil Na ) ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. यातलेच एक पात्र म्हणजे बंधू मामा.
झी मराठी वाहिनीवरील अनेक मालिका हळूहळू निरोप घेताना दिसून येत आहेत. ‘माझा होशील ना’ ( Majha Hoshil Na ) ही मालिकाही अंतिम टप्प्यात असल्याची चर्चा आहे. पण म्हणून या मालिकेची लोकप्रियता कमी झालेली नाही. अल्पावधीत ही मालिका लोकप्रिय झाली. आदित्य व सईची भूमिका साकारणा-या विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडेची फ्रेश जोडी घराघरात लोकप्रिय झाली. आदित्य-सईची हटके लव्हस्टोरी आणि मामाचं असणार सॉलिड कॉम्बिनेशन अशी भन्नाट कल्पना रंगवणा-या या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. यातलेच एक पात्र म्हणजे बंधू मामा. ही व्यक्तिरेखा साकारली आहे ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे (Sunil Tawde ) यांनी. सुनील तावडे गेली अनेक वर्षे मराठी इंडस्ट्री मध्ये कार्यरत आहेत. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे.
जबरदस्त, मलाल, शोध, रेडीमिक्स, मेमरी कार्ड, आयपीएल- इंडियन प्रेमाचा लफडा, फ्रेंडशिप डॉट कॉम, महागुरू, गोलमाल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये सुनील तावडे यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. झी मराठी वरील ‘फू बाई फू’ या कार्यक्रमातून त्यांनी सगळ्या महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावले. याच सुनील तावडे यांचा मुलगाही अभिनेता आहे, हे तुम्हाला माहित आहे का? होय, सुनील तावडे यांचा मुलगाही मराठी मनोरंजनविश्वातील एक लोकप्रिय चेहरा आहे. त्याचे नाव आहे शुभंकर तावडे (Shubhankar Tawde). शुभंकरला झी युवा वाहिनीवरील ‘फ्रेशर्स’ या मालिकेत तुम्ही पाहिले असेलच.
‘डबल सीट’ या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरूवात केली. यानंतर ‘कागर’ या चित्रपटात तो अभिनेत्री रिंकू राजगुरू बरोबर प्रमुख भूमिकेत दिसला होता. ‘काळे धंदे’ या वेब सिरीज मध्येही त्याने भूमिका साकारली. खास म्हणजे, या सीरिजमध्ये तावडे बापलेकांची जोडी पहिल्यांदा एकत्र दिसली होती. वडीलांप्रमाणेच शुभंकर एक गुणी अभिनेता आहे.
शुभंकरचे शिक्षण मुंबईमध्येच झाले आहे. तो मुंबईच्या रुईया कॉलेजचा विद्यार्थी आहे. मुंबईच्या ड्रामास्कूल मधून त्याने आपला अभिनय आणि फिल्ममेकींग चा कोर्स पूर्ण केला आहे. कॉलेजमध्ये असताना त्याने अनेक हिंदी आणि मराठी नाटकांमध्ये कामे केली आहेत. कॉलेज मध्ये असताना त्याने अनेक सांस्कृतिक कर्यक्रमांमध्ये भाग घेत आपला अभिनय सुरू केला.