कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळताना पाहून मराठी अभिनेत्री ढसाढसा रडली, भावुक व्हिडिओ समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 09:29 AM2024-08-09T09:29:13+5:302024-08-09T09:30:07+5:30
कोल्हापूर शहरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली. केशवराव भोसले नाट्यगृहाची झालेली ही अवस्था पाहून कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत.
कोल्हापूर शहरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली.रात्री उशिरापर्यंत आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू होते.आग एवढी भयानक होती की अग्निशमन दलालाही या ठिकाणी ही आग विझवताना अडचणी येत होत्या. लाकूड सामान, होमच्या खुर्च्या आणि इलेक्ट्रिक वायरिंग यामुळे आग आणखी भडकत गेली आणि बघता बघता केशवराव भोसले नाट्यगृह हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. केशवराव भोसले नाट्यगृहाची झालेली ही अवस्था पाहून कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत.
मराठी अभिनेत्री सोनाली पाटीलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ती केशवराव भोसले नाट्यगृ्ह आगीच्या भक्ष्यस्थानी गेलेले पाहून भावुक झाली आहे. "मी आजच कोल्हापूरला आले. आम्हा कोल्हापूरकरांसाठी आजचा हा सगळ्यात वाईट दिवस आहे. खरं तर संपूर्ण रंगभूमीसाठी हा वाईट दिवस आहे. केशवराव भोसले नाट्यगृह जळून पू्र्ण खाक झालं आहे. हे बघायचीदेखील इच्छा होत नाहीये. आमच्या सगळ्यांची नाळ त्याच्याशी जोडलेली आहे. ज्या रंगमंचावर आम्ही उभे राहिलो. या मंचावर इतके प्रयोग केले. ती गोष्ट आमचं सगळ्यात मोठं घर, आमचं वैभव हे पू्र्ण खाक झालंय. मला माहीत नाही की हे नाट्यगृह पुन्हा कसं उभं राहील...", असं सोनाली म्हणत आहे. नाट्यगृहाची अशी अवस्था पाहून सोनालीलाही इतर कलाकारांप्रमाणे अश्रू अनावर झाले आहेत.
केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी दुर्घटना
संगीत सूर्य केशवराव भोसले यांचे जयंती शुक्रवारी असल्यामुळे शासनाच्या वतीने केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांच्यावरील चित्र प्रदर्शन ही मांडण्यात आले होते. तेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार होते. त्या आधीच त्यांची स्मृती असलेले हे केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली.