‘रिअॅलिटी शो’ खरंच स्क्रिप्टेड असतात? सचिन खेडेकर यांनी दिलं खरं खरं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 04:38 PM2021-08-02T16:38:02+5:302021-08-02T16:40:00+5:30
अलीकडे ‘इंडियन आयडल 12’ हा रिअॅलिटी शो वादात सापडला होता. हा शो स्क्रिप्टेड आहे, असा एक आरोपही या निमित्तानं झाला. त्यामुळं रिअॅलिटी शो खरंच स्क्रिप्टेड असतात का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडणं स्वाभाविकच आहे.
रिअॅलिटी शो म्हणजे कायम वादाचा विषय. अलीकडे ‘इंडियन आयडल 12’ हा सिंगींग रिअॅलिटी शो असाच वादात सापडला होता. रिअॅलिटी शो स्क्रिप्टेड असतात, असा एक आरोपही या निमित्तानं झाला. रिअॅलिटी शो खरंच स्क्रिप्टेड असतात का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडणं त्यामुळं स्वाभाविकच आहे. आता ‘कोण होणार करोडपती’ (Kon Honaar Crorepati ) या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालक आणि अभिनेते सचिन खेडेकर (Sachin Khedekar ) यांनी प्रेक्षकांच्या मनातल्या या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.
‘महाराष्ट्र टाईम्स’ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर मत मांडलं. रिअॅलिटी शो खरंच स्क्रिप्टेड असतात का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर सचिन खेडेकर यांनी प्रेक्षक आता सुज्ञ झालायं, असं उत्तर दिलं.
ते म्हणाले, ‘रिअॅलिटी शोमध्ये एखादा प्रसंग मुद्दाम आणला गेला तर प्रेक्षक ते अगदी क्षणात पकडतात. कारण आज प्रेक्षक सुज्ञ झालायं. ‘कोण होणार करोडपती’ या शोबद्दल सांगायचं तर माझ्या मते, हा रिअॅलिटी शो नसून खेळ आहे, एक स्पर्धा आहे. मी हा शो होस्ट करतो, लेखक मला सूत्रसंचालनाची वाक्य लिहून देतो. हॉट सीटवर बसल्यावर स्पर्धक आणि माझ्यात जो काही संवाद होतो, तो मात्र उत्स्फूर्त असतो. त्याला कोणतीही स्क्रिप्ट नसते. माझ्यासमोर बसलेला स्पर्धक एखाद्या प्रसंगाला भावुक होतो, तेव्हा स्पर्धकानं त्याच्या भावनांना आवर घालून आधी त्याचा खेळ खेळावा, असा माझा प्रयत्न असतो. रिअॅलिटी शो कोणताही असो त्यात कोणाच्याही भावभावनांचा वापर होता कामा नये, असं मला वाटतं.’
कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहेत. मराठी घराघरांत सगळ्यांना सचिन खेडेकर परिचित आहेत. आपल्या देहबोलीमुळे आणि आवाजामुळे सचिन खेडेकर हे प्रेक्षकांचे लाडके अभिनेते आहेत. या कार्यक्रमात स्पर्धक हॉटसीटवर येतात. त्या प्रत्येकाला आपलेसे करून त्यांच्याबरोबर हा ज्ञानाचा खेळ खेळावा लागतो. प्रेक्षकांना मोहित करून टाकणारा आवाज आणि समोरच्याशी संवाद साधण्याचे कसब हे खेडेकरांचे गुण आहेत आणि त्यामुळेच स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना ते आपलेसे वाटतात.