वडिलांच्या औषधालाही पैसे नव्हते...; सांगताना नानांचा कंठ दाटला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 05:41 PM2021-07-18T17:41:34+5:302021-07-18T17:42:23+5:30
Kon Honaar Crorepati : ‘कोण होणार करोडपती’च्या नाना पाटेकर यांनी मंचावर अनेक आठवणींना उजाळा दिला...
‘कोण होणार करोडपती’ ( Kon Honaar Crorepati) हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सचिन खेडेकर (Sachin Khedekar ) हे होस्ट करत असलेल्या या शोच्या ‘कर्मवीर स्पेशल’ एपिसोडमध्ये नुकतीच नाना पाटेकर (Nana Patekar ) यांनी हजेरी लावली आणि हॉट सीटवर बसलेले नाना काही क्षण भावुक झालेले संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले.
वडिलांच्या आठवणीत नाना काही क्षण प्रचंड भावुक झालेत. बाबा आजारी होते तेव्हा त्यांच्या औषधालाही माझ्याकडे पैसे नव्हते, हे सांगताना नानांचा कंठ दाटून आला.
‘मी आज नट आहे पण माझ्या वडिलांना म्हणजेच आमच्या काकांना नाटक आणि सिनेमावर खूप प्रेम होतं. एक बाप मुलाला घेऊन तमाशाला जातो, हे ऐकायला विचित्र वाटेल. पण माझे वडील मला तमाशाला घेऊन जायचे. तू चल,त्या कलाकारांचा अभिनय पाहा असं ते कौतुकानं म्हणायचे आणि मला सोबत न्यायचे. वडिल आजारी होते, त्या त्यांच्या शेवटच्या दिवसांत माझी परिस्थिती फार नीट नव्हती. दुर्दैवानं आपल्या नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ते गेले. औषधालाही पैसे नव्हते. मंगेश आणि मी केईएम हॉस्पिटलच्या बाहेर एका दुकानाच्या पायरीवर बसलो होतो आणि माझे वडील आतमध्ये जनरल वॉर्डमध्ये होते, असं नाना म्हणाले ते ऐकून ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावरचं वातावरण काहीक्षण भावुक झालं होतं.
अशीही एक आठवण...
माझं ‘महासागर’ आलं तेव्हा मला ते पाहायचंय असं काका म्हणाले. तुम्ही पाहिलंय ना ते नाटक, असं मी त्यांना म्हणालो. त्यावर, नाही रे गेल्या वेळी मी पाहायला निघालो आणि चष्मा पडला. त्याच्यावर पाय पडला आणि तो फुटला. पण तुला वाईट वाटेल म्हणून बोललो नाही, असं ते मला म्हणाले. काका आजारी होते. पण मी त्यांना घेऊन शिवाजी मंदिरमध्ये गेलो होतो. मी तो प्रयोग फक्त काकांसाठीच केला होता. त्यानंतर माझे सिनेमे त्यांना पाहता आलेच नाहीत. काकांना मी भौतिक सुख देऊ शकलो नाही, हे सांगतानाही नानांचा कंठ दाटून आला.