कोण होणार करोडपती: एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी अशोक सराफ खेळणार 'करोडपती'चा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 03:09 PM2022-06-22T15:09:20+5:302022-06-22T15:10:14+5:30

Ashok Saraf: समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

kon honar Crorepati show marathi actor Ashok Saraf will play game for HIV positive children | कोण होणार करोडपती: एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी अशोक सराफ खेळणार 'करोडपती'चा खेळ

कोण होणार करोडपती: एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी अशोक सराफ खेळणार 'करोडपती'चा खेळ

googlenewsNext

मनोरंजनसृष्टीतील अथांग सागरामध्ये अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे विनोदाचे बादशाह म्हणजे अशोक सराफ ( Ashok Saraf). केवळ उत्तम अभिनयच नव्हे तर विनोदाचं उत्तम टायमिंग साधण्यासाठीही ते तितकेच प्रसिद्ध आहेत. त्यामुळे कलाविश्वात आज त्यांचा मोठा दबदबा असल्याचं पाहायला मिळतं. अनेक चित्रपटांमध्ये झळकलेले अशोक सराफ लवकरच कोण होणार करोडपती या कार्यक्रमाच्या मंचावर हजेरी लावणार आहेत.

दोन आठवड्यांपूर्वी  सोनी मराठी वाहिनीवर 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू झालं. पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि काजोल विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर दुसऱ्या आठवड्यात ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका पद्मश्री सुधा मूर्ती उपस्थित होत्या. त्यानंतर आता या मंचावर अशोक मामा' हजेरी लावणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी निवेदिता सराफ, त्यांची बहीण डॉ. मिनल परांजपे आणि धाकटा भाऊ सुभाष सराफदेखील हजेरी लावणार आहेत.

यशाचं शिखर गाठूनही पाय कायम जमिनीवर असणाऱ्या अशोक मामांनी  विनोदी भूमिकांबरोबरच गंभीर भूमिकासुद्धा चोख बजावल्या आहेत आणि म्हणूनच काही मोजक्या चतुरस्र अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते.  सिनेसृष्टीतल्या त्यांच्या कारकिर्दीमधल्या वैविध्यपूर्ण भूमिका त्यांनी जबरदस्त अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर कोरून ठेवल्या आहेत. 

समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. पंढरपूरजवळील एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी काम करणार्‍या आणि त्यांना आधार देणार्‍या प्रभा-हिरा प्रतिष्ठान संचलित 'पालवी' या सेवाभावी संस्थेसाठी अशोक सराफ 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. 

दरम्यान,अशोक सराफ हे नाव घेतल्यानंतर 'अशी ही बनवाबनवी', 'धुमधडाका', 'नवरा माझा नवसाचा' असे अनेक हीट चित्रपट आपल्या डोळ्यांसमोर येतात. त्यांचा 'ययाती'पासून सुरू झालेला नाट्यसृष्टीतला प्रवास आत्ताच्या 'व्हॅक्युम क्लिनर'पर्यंत अव्याहतपणे सुरू आहे. अशोक मामांना चित्रपटसृष्टीत पदार्पण करून ५० वर्षं पूर्ण झाली आहेत. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर सिनेनाट्यसृष्टीतल्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात येणार आहे.  

Web Title: kon honar Crorepati show marathi actor Ashok Saraf will play game for HIV positive children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.