कृष्णा चली लंडनची टीम शूटिंगसाठी पोहोचली लंडनला!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 06:35 PM2018-12-25T18:35:07+5:302018-12-25T18:44:53+5:30
‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत लंडनला जाण्याचे आपले स्वप्न कृष्णाने (मेघा चक्रबोर्ती) अखेरीस पूर्ण केले असून आपला पती राधे (गौरव सरीन) याच्यासह जीवनातील एका नव्या प्रवासाला प्रारंभ केला आहे.
‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत लंडनला जाण्याचे आपले स्वप्न कृष्णाने (मेघा चक्रबोर्ती) अखेरीस पूर्ण केले असून आपला पती राधे (गौरव सरीन) याच्यासह जीवनातील एका नव्या प्रवासाला प्रारंभ केला आहे. लंडनमधील चित्रीकरणात निर्माते कोणतीही कसर शिल्लक ठेवणार नसून लंडनमधील काही प्रेक्षणीय आणि सुंदर स्थळांच्या पार्श्वभूमीवर ते चित्रीकरण करणार आहेत.
लंडनमधील चित्रीकरणाच्या आपल्या अनुभवासंदर्भात मेघा म्हणाली, “लंडनसारख्या देखण्या शहरात चित्रीकरण करण्याच्या कल्पनेने मी हरखून गेले होते. इथल्या लोकांचे नियम काही वेगळेच असले, तरी ते हे नियम कठोरपणे पाळतात. मात्र परदेशी, विशेषत: भारतीय पर्यटकांबाबत ते विशेष सौजन्याने आणि आपलेपणाने वागतात. आता डिसेंबर असल्याने सारं शहर हे ख्रिस्तमसच्या सणासाठी सजलं आहे. मालिकेतील काही प्रसंगांसाठी आम्ही लंडनच्या पदपथांवर चित्रीकरण केलं आणि त्यावेळी आम्हाला ख्रिस्तमससाठी केलेली काही अतिशय शोभिवंत आरास कॅमेऱ्यात पकडता आली. त्याशिवाय, आम्ही लंडन आय, लंडन ब्रिज आणि ऑक्सफर्ड विद्यापिठासारख्या काही अतिशय प्रसिध्द स्थळांवरही चित्रीकरण केलं. वर्षाच्या या काळात हे शहर खूपच थंड होत असलं, तरी आम्ही त्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला.
ही संधी मला मिळाली, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते. प्रेक्षकांनाही राधे आणि कृष्णा यांना लंडनमधील चित्रीकरण पाहणे पसंत पडेल आणि ते आमची लंडनमधील नवी धाडसे पाहतील, अशी आशा आहे.” लंडनसारख्या सुंदर शहरातील प्रेक्षणीय स्थळांवरील प्रसंग पाहण्यास प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, यत शंका नाही.