'त्यांच्यासोबत येण्याचा तोटा, कारण..'; कृतिकाला होतोय अरमान-पायलसोबत Bigg boss OTT 3मध्ये सहभागी होण्याचा पश्चाताप?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 11:46 AM2024-06-23T11:46:14+5:302024-06-23T11:46:44+5:30
Kritika malik: सध्या या पर्वामध्ये अनेकांचं लक्ष अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नींकडेच वेधलं आहे. सोशल मीडियावर पायल आणि कृतिका कायम बहिणींप्रमाणेच राहतात. परंतु, खऱ्या आयुष्यात त्यांच नातं कसंय हे या शोमधून उलगडलं जाणार आहे.
वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Bigg boss OTT च्या तिसऱ्या पर्वाची नुकतीच सुरुवात झाली आहे. शुक्रवारी मोठ्या दणक्यात या कार्यक्रमाचा प्रीमियर सोहळा पार पडला. शनिवारी या शोचा पहिला एपिसोड टेलिकास्ट करण्यात आला.विशेष म्हणजे हा शो सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सना मकबूल आणि साई केतन राव यांच्यामध्ये किराणा सामानावरुन जोरदार वाद झाला. त्याच्यानंतर आता या शोमध्ये आपल्या दोन पत्नींसोबत सहभागी झालेला अरमान मलिक चर्चेत आला आहे.
अरमानची दुसरी पत्नी कृतिका हिने या शोमध्ये मोठं भाष्य केलं आहे. नवरा अन् सवतीसोबत या शोमध्ये सहभागी झाल्याचं नुकसान आहे असं ती म्हणाली. बिग बॉस ओटीटी या शोमध्ये कृतिका तिच्या पार्टनरसोबत सहभागी झाली आहे. त्यामुळे या गोष्टीचा तिला होणारा फायदा आणि तोटा काय? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, कृतिकाने दिलेल्या उत्तरामुळे नेटकऱ्यांनी भुवया उंचावल्या आहेत.
"ज्यावेळी मी खूप इमोशनल होते त्यावेळी अरमान आणि कृतिका मला खूप सांभाळून घेतात. पण, त्या दोघांसोबत इथे येण्याचा तोटाही आहे. कारण, जर एखाद्या टास्कमध्ये ते माझ्या विरुद्ध उभे असतील आणि मला त्यांना हरवायचं असेल, त्यांच्याशी स्पर्धा करायची असेल तर माझ्यासाठी ते खूप त्रासदायक ठरेल," असं कृतिका म्हणाली.
दरम्यान, सध्या या पर्वामध्ये अनेकांचं लक्ष अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नींकडेच वेधलं आहे. सोशल मीडियावर पायल आणि कृतिका कायम बहिणींप्रमाणेच राहतात. परंतु, खऱ्या आयुष्यात त्यांच नातं कसंय हे या शोमधून उलगडलं जाणार आहे. त्यामुळे यंदाचं पर्व अनेक कारणांसाठी खास ठरणार आहे.