'सलग ६० तास काम केलं, सेटवरच...'; क्रिस्टल डिसुजाने सांगितला इंडस्ट्रीतील वाईट अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 03:17 PM2024-09-26T15:17:20+5:302024-09-26T15:17:52+5:30
क्रिस्टल डिसुजाने इंडस्ट्रीची केली पोलखोल
क्रिस्टल डिसुजा (Krystle Dsouza) नुकतीच टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'एक हजारो मे मेरी बहना है' या हिंदी मालिकेतून ती घराघरात पोहोचली. नुकताच तिचा 'विस्फोट' सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला. नुकतंच एका मुलाखतीत तिने इंडस्ट्रीतील आलेल्या वाईट अनुभवांचा खुलासा केला. सेटवर सलग ६० तास काम करुन ती बेशुद्धही झाली होती. तेव्हा अँब्युलन्स बोलवायला लागल्याचं ती सांगते.
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत क्रिस्टल डिसुजा म्हणाली, "मला सुरुवातीला दिवसाला २५०० रुपये मिळायचे. तुम्ही १२ च तास शूट करु शकता असं सांगणारे कोणतेही नियम नव्हते. मी सलग न थांबता ६० तास शूट केलं आहे. बरेचदा सेटवरच चक्कर येऊन पडले आहे. टीमला अँब्युलन्स बोलवावी लागली आहे. मला IV ड्रिप आणि औषधं देण्यात यायची आणि मी पुन्हा सेटवर जायचे. याचा मला त्रास व्हायचा मी सेटवर चालूही शकत नव्हते. पण चांगलं काम करण्यासाठी मला हे करावं लागणार होतं."
ती पुढे म्हणाली, "टीव्हीने मला खूप आत्मविश्वासू, स्ट्राँग बनवलं. मी टीव्हीमुळेच आज जगत आहे. नाहीतर मला अनेकदा आर्थिक चणचणही जाणवली आहे. पण आज मी टीव्हीमुळेच इथपर्यंत पोहोचले आहे."
याआधीही अनेक अभिनेत्रींनी सेटवरील तासन तास शूटिंगचा अनुभव सांगितला आहे. त्यावर मात करत आज या अभिनेत्रींनी आपलं स्थान मिळवलं आहे. क्रिस्टलही त्यापैकीच एक आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या 'विस्फोट' सिनेमात तिने फरदीन खानसोबत बोल्ड सीन्सही दिले. क्रिस्टल सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. तिचे लाखो चाहते आहेत.