कुमार सानूने इंडियन आयडलच्या या स्पर्धकाला दिली एक खास भेटवस्तू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 06:00 AM2020-01-31T06:00:00+5:302020-01-31T06:00:01+5:30
इंडियन आयडलच्या आगामी भागात 90 च्या दशकातील प्रसिद्ध गायक कुमार सानू हजेरी लावणार आहे.
सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनच्या इंडियन आयडल या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट गेले आहेत. या कार्यक्रमाचा यंदाचा सिझन प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. नेहा कक्कड, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत असून या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
इंडियन आयडलच्या आगामी भागात 90 च्या दशकातील प्रसिद्ध गायक कुमार सानू हजेरी लावणार आहे. कुमार सानूने या वर्षी संगीत क्षेत्रात पदार्पण करून 30 वर्षं पूर्ण झाली असून त्याचे हे मोठे यश इंडियन आयडलच्या सेटवर साजरे केले जाणार आहे. स्पर्धक कुमार सानूची काही सदाबहार गीते सादर करून जुन्या आठवणींना उजाळा देणार आहेत. विशेष म्हणजे, अत्यंत लोकप्रिय असलेल्या स्पर्धकांपैकी एक असलेल्या सनी हिंदुस्तानीसाठी तर हा दिवस खूपच खास ठरला. कारण कुमार सानूने त्याला वाघाचे प्रिंट असलेले जॅकेट आणि खास ग्लेअर्स भेट म्हणून दिले.
सनी हिंदुस्तानीसाठी कुमार सानूने वाघाचे प्रिंट असलेले जॅकेट आणि खास ग्लेअर्स आणले होते. कुमार सानूसारख्या प्रसिद्ध गायकाकडून ही विशेष भेट मिळाल्यामुळे सनीने या दिग्गज गायकाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी ते जॅकेट आणि ग्लेअर्स घालून गाणे सादर केले. ‘जीता था जिस के लिए’ हे गाणे सनीने सादर करताच कुमार सानू प्रचंड प्रभावित झाला आणि टायगर हे त्याचे आवडते टोपणनाव सनी हिंदुस्तानीला दिले.
सनीच्या उत्कृष्ट सादरीकरणाने मंत्रमुग्ध झालेल्या कुमार सानूने त्याची प्रशंसा करताना म्हटले, “आज माझ्या जॅकेटने तुझ्यासाठी जादू केली आणि या खास भेटवस्तू तू तुझ्याबरोबर घेऊन जाव्यास अशी माझी इच्छा आहे.”
परीक्षक हिमेश रेशमियाने देखील सनी हिंदुस्तानीची प्रशंसा केली आणि तो म्हणाला, “आज तू अगदी मनापासून गायला आहेस. आज सनीची जादू सर्वत्र दिसली. आज सनीचे गाणे ऐकणे एक पर्वणीच होती.”