'ती परत आलीये' मालिकेच्या अभिनेत्रीने शेअर केला भयावह प्रसंग,वाचून तुमचाही उडेल थरकाप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 03:59 PM2021-09-20T15:59:24+5:302021-09-20T15:59:36+5:30
'ती परत आलीय' मालिकेचे ज्या भागात शूटिंग होतेय तिथे आजूबाजूला खूप मोठं जंगल आहे आणि फारशी वस्ती नाही आहे.
'ती परत आलीये' म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला या मालिकेने आपल्या टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवला आहे. झी मराठीवरील हि मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे आणि सुरुवाती पासूनच प्रेक्षकांनी या मालिकेला आणि या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेला पसंती दर्शवली. त्यातील एक लक्षवेधी व्यक्तिरेखा म्हणजे सायलीची. हि भूमिका निभावणारी अभिनेत्री कुंजिका काळवींट प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय.
हॉरर मालिकेसाठी चित्रीकरण करताना कलाकारांनासुद्धा ऑफकॅमेरा धाकधूक असते. याबद्दल सांगताना कुंजिका म्हणाली," आम्ही ज्या भागात शूटिंग करतोय आणि जिथे राहतोय तिथे आजूबाजूला खरंच खूप जंगल आहे आणि फारशी वस्ती नाही आहे. गावात खूप आतल्या बाजूला हे रिसॉर्ट आहे आणि आमचं शूटिंग हे बहुतेक वेळेस रात्रीच असतं त्यामुळे अनेकदा आम्हालाच घाबरायला होतं. मालिकेत वापरलेलं मास्क खूप हॉरिबल आहे. हॉटेलच्या काचेवर सावली जरी दिसली तरी आम्ही घाबरतो. पण हळूहळू आता हे सगळं सवयीचं होतंय."
संपूर्ण कलाकारांची फौज ऑफकामेरा किती धमाल करतेय हे सांगताना कुंजिका म्हणाली, "आमची सेटवर प्रचंड धम्माल सुरु असते. आमचे सगळ्यांचे सीनही बऱ्याचदा एकत्र असतात. आम्ही नऊजण जवळपास एकाच वयाचे असल्यामुळे सिनच्यामध्ये आमची धमाल सुरु असते. केवळ धमाल मस्तीच नाही तर आम्ही आमचे अनुभव देखील एकमेकांसोबत शेअर करत असतो. समीर खांडेकर, वैभवमुळे सेटवर धमाल चालूच असते. आम्ही मुंबई बाहेर शूटिंग करत असल्यामुळे आम्ही सगळेच सतत एकत्र असतो आम्ही एकमेकांना सिनमध्येही खूप मदत करतो."
यापूर्वी कुंजिकाने मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारली आहे. तिच्या अनुभवाविषयी तिने सांगितले की, मध्यंतरीच्या काळात मला तशाच प्रकारच्या भूमिकांसाठी विचारण्यात येत होतं. एक कलाकार म्हणून मला नव्या भूमिकांचं अवकाश शोधयचं होतं.
जिथं मला नवं काही शिकायला मिळेल. ही संधी ‘ती परत आलीये’ या मालिकेच्या निमित्तानं मिळाली. मला स्वतःला थ्रिलर हा प्रकार अधिक आवडतो. त्यामुळे अशा मालिकेत एक वेगळ्या धाटणीची भूमिका साकारण्याची मजा काही औरच असल्याचे तिने सांगितले होते.