'लागिरं झालं जी'फेम आज्याने केली गरजू शाळकरी मुलाला मदत; सोशल मीडियावर होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 12:00 PM2023-07-02T12:00:00+5:302023-07-02T12:00:02+5:30
Nitish chavhan: नितीशने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत या मुलाला मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे लागिरं झालं जी. या मालिकेच्या माध्यमातून आज्या आणि शितली ही जोडी घराघरात पोहोचली. ही भूमिका अभिनेता नितीश चव्हाण आणि शिवानी बावकर यांनी साकारली होती. आजही प्रेक्षकांमध्ये ही जोडी लोकप्रिय असून सध्या सोशल मीडियावर नितीशची चर्चा रंगली आहे. नितीशने एका गरजू शाळकरी मुलाला मदत केली असून नेटकरी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
सध्या सोशल मीडियावर नितीशचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो एका लहान शाळकरी मुलासोबत दिसून येत आहे. हा व्हिडीओ नितीशने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नितीश साताऱ्यात असून त्याला कोल्हापूरचा देवसागर ढाले हा शाळकरी मुलगा भेटला. देवसागर नववीमध्ये शिकत असून त्याची घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी तो साताऱ्यामध्ये अगरबत्त्या विकायला येतो. देवसागर वडील नसल्यामुळे त्याची आई घरकाम करुन कुटुंब चालवते. देवसागरने त्याच्या कुटुंबाविषयी ही माहिती दिल्यानंतर नितीशने त्याच्याकडे असलेल्या सगळ्या अगरबत्त्या विकत घेतल्या आणि त्याला शक्य होईल तशी मदत केली.
इतकंच नाही तर, 'तुम्हाला हा मुलगा कुठेही दिसला तरी याच्याकडून नक्की अगरबत्त्या विकत घ्या आणि त्याला मदत करा' असं आवाहन नितीशने त्याच्या चाहत्यांना आणि सातारकरांना केलं आहे. या व्हिडीओला त्याने 'चाल रं गड्या तू पुढ' असं कॅप्शन दिलं आहे.
दरम्यान, नितीशने कसलाही विचार न करता या लहान मुलाला मदत म्हणून त्याच्याकडच्या सगळ्या अगरबत्त्या विकत घेतल्या. त्यामुळे नेटकरी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तसंच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.