'लागीरं झालं जी' फेम अभिनेत्याचं फूड इंडस्ट्रीत पदार्पण; सुरु केला स्वत:चा फूड ट्रक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 11:45 AM2024-03-13T11:45:49+5:302024-03-13T11:47:48+5:30
Marathi actor: या अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.
छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली लोकप्रिय मालिका म्हणजे लागीरं झालं जी. सीमेवर लढणारा जवान, त्याचं स्वप्न, त्याचं प्रेम आणि कुटुंब या सगळ्यावर प्रकाश टाकणारी ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड गाजली. ही मालिका संपून आता बराच काळ झाला आहे. मात्र, त्यातील कलाकार आजही चर्चेत येतात. यामध्येच या मालिकेतील एका अभिनेत्याने स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. या अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या नव्या व्यवसायाची माहिती चाहत्यांना दिली.
लागीरं झालं जी मालिकेतील टॅलेंट अर्थात अभिनेता महेश जाधव (mahesh jadhav) याने स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. महेशने त्याचा फूड ट्रक सुरु केला आहे. महेश मूळचा साताऱ्यातील फलटण येथील आहे. त्यामुळे त्याने फलटणमध्येच हा फूड ट्रक सुरु केला आहे.
“Hello Shwarma” असं महेशच्या या फूड ट्रकचं नाव आहे. सोबतच त्याने खास पद्धतीने त्याचा फूड ट्रक डिझाइन केला आहे. या ट्रकवर त्याचं छान चित्र रेखाटण्यात आलं आहे. महेशने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्याच अभिनंदन करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, महेशने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. यात चला हवा येऊ द्या, फटाक अशा मालिका, सिनेमांमध्ये झळकला आहे. आतापर्यत कलाविश्वातील अनेक कलाकारांनी अभिनयाव्यतिरिक्त अन्य क्षेत्रांमध्ये नशीब आजमावलं आहे. हार्दिक जोशी, श्रेया बुगडे, सुप्रिया पाठारे, यशोमन आपटे यांसारख्या अनेक कलाकारांनी फूड इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे.