होणाऱ्या दीरासोबत लग्न, मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी भडकले, म्हणाले- "माझा नवरा तुझी बायको..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:09 IST2025-02-27T13:08:49+5:302025-02-27T13:09:20+5:30
मालिकेचा हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

होणाऱ्या दीरासोबत लग्न, मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी भडकले, म्हणाले- "माझा नवरा तुझी बायको..."
'लग्नानंतर होईलच प्रेम' ही स्टार प्रवाहवरील मालिका सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे. मालिकेत पार्थ आणि नंदिनीचं लग्न होणार असतं. मात्र नंदिनी किडनॅप होते. त्यामुळे गावकरांच्या दबावाखाली पार्थला नंदिनीची बहीण काव्याशी लग्न करावं लागतं. तर दुसरीकडे नंदिनी परत आल्यानंतर तिच्यावरही गावकरी लग्नासाठी दबाव टाकतात. नाईलाजाने जीवा नंदिनीशी लग्न करण्याची तयारी दाखवतो, असं मालिकेत दाखविण्यात आलं आहे.
या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये पार्थ आणि काव्या लग्नानंतर गृहप्रवेश करताना दिसत आहेत. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ नंदिनी आणि जीवादेखील घरात एन्ट्री घेतात. जीवाचं नंदिनीशी लग्न झालेलं पाहून काव्याला मोठा धक्का बसल्याचं दिसत आहे. तर पार्थसाठीदेखील हे सगळं शॉकिंग आहे. मात्र मालिकेचा हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
"मालिकेच नाव चुकलं लग्ना नंतर होईलच प्रेम नव्हतं पाहिजे... अलटी पलटी सुमडीत कलटी असं पाहिजे होतं...नाही तर माझी बायको तुझी, तुझी बायको माझी..नाही तर माझा नवरा तुझा, तुझा नवरा माझा असं पाहिजे होतं", असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने "ताई माझा प्रियकर तुझा नवरा आणि दादा माझी प्रेयसी तुझी बायको", अशी कमेंट केली आहे.
"चांगल्या मालिकेची वाट लावली", "किती फाल्तू स्टोरी", असंही काहींनी म्हटलं आहे. तर काही चाहत्यांनी आता मालिका बघायला मजा येणार असल्याचंही कमेंटमध्ये म्हटलं आहे.