शुभमंगल सावधान! दिव्या पुगावकर अडकली विवाहबंधनात, लग्नातील फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 09:36 IST2025-02-17T09:32:22+5:302025-02-17T09:36:40+5:30
'लक्ष्मी निवास' मालिकेतील जान्हवी अर्थात दिव्या पुगावकरही विवाहबंधनात अडकली आहे.

शुभमंगल सावधान! दिव्या पुगावकर अडकली विवाहबंधनात, लग्नातील फोटो आले समोर
Divya Pugaonkar: सध्या मराठी कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. नववर्षाच्या सुरुवातीपासूनच अनेक सेलिब्रिटींनीलग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अनेक मराठी अभिनेते आणि अभिनेत्री लग्नबंधनात अडकले आहेत. नुकतंच अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत यांनी धुमधडाक्यात लग्न केलं. आता त्यांच्यानंतर अजून एक प्रसिद्ध जोडप्यानं लग्न आहे. 'लक्ष्मी निवास' मालिकेतील जान्हवी अर्थात दिव्या पुगावकरही बोहल्यावर चढली आहे. काल १६ फेब्रुवारी रोजी दिव्या पुगावकरचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. तिच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.
दिव्या पुगावकरनं बॉयफ्रेंड अक्षय घरतसोबत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. दिव्या पुगावकरने लग्नासाठी पिवळी साडी नेसली होती. तर अक्षयनं तिला मॅचिंग शेरवानी परिधान केली होती. त्यावर फेटा असा लूक त्याने केला होता. यावेळी दिव्या आणि अक्षय हे जोडपं खुपचं सुंदर दिसत होतं. दिव्याच्या लग्नातील फोटो तिचा सहकलाकार सिद्धार्थ खिरिडने शेअर केला आहे. 'दिव्या का दुल्हा' असे कॅप्शन देत त्याने हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.
दिव्याने लग्न मंडपात राजेशाही थाटात एन्ट्री घेतली होती. तिच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. लग्नाचे फोटो समोर येताच सर्वांनी कमेंट्सच्या माध्यमातून अभिनंदन केलं आहे. दिव्या-अक्षयच्या लग्नाची धामधूम गेल्या आठवडाभरापासून सुरु होती. मेंहदी, संगीत आणि हळदी सोहळ्याच्या फोटो अन् व्हिडीओला लोकांची चांगलीच पसंती मिळाली. दिव्याच्या लग्नात तिच्या 'लक्ष्मी निवास' (Laxminiwas) मालिकेतील टीमनंही हजेरी लावली होती. दिव्या पुगावकर ही बऱ्याच कालावधीपासून अक्षय घरतसोबत रिलेशनशीपमध्ये होती. अक्षय घरत हा फिटनेस मॉडेल असून न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर म्हणूनही त्याची ओळख आहे.