लक्ष्मी सदैव मंगलम् या मालिकेतील कलाकारांनी सांगितल्या पावसाच्या आठवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 04:27 PM2018-08-02T16:27:00+5:302018-08-02T16:30:17+5:30
लक्ष्मी सदैव मंगलम् मधील ओमप्रकाश शिंदे, सुरभी हांडे आणि समृद्धी केळकर यांनी त्यांच्या पावसाळ्यातील आठवणी सगळ्यांसोबत शेअर केल्यात.
पावसाळा म्हटलं की, बऱ्याच गोष्टी आठवतात. हा सगळ्यांचाच आवडता ऋतू. या पाऊसाशी आपल्या अनेक आठवणी जोडलेल्या असतात. पावसाळा म्हटलं की, चहूबाजूला हिरवगार वातावरण, थंडगार वारा, पिकनिक, कांदा भजी आणि आपल्या माणसाची साथ... हा पाऊस आपल्याला अनेक आठवणी घेऊन येतो आणि अनेक आठवणी देऊन जातो पुढच्या वर्षासाठी. लक्ष्मी सदैव मंगलम् मधील ओमप्रकाश शिंदे, सुरभी हांडे आणि समृद्धी केळकर यांनी त्यांच्या पावसाळ्यातील या आठवणी सगळ्यांसोबत शेअर केल्यात.
लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेतील मल्हार म्हणजेच ओमप्रकाशसाठी पाऊस म्हणजे वेगवेगळ्या छटा असणारा आनंदाचा इंद्रधनुष्य. समृद्धीसाठी (लक्ष्मी) पाऊस म्हटलं की, डोळ्यासमोर येतो हिरवागार निसर्ग, शाळेला मिळालेल्या सुट्या, गरम कणीस आणि महत्त्वाचे म्हणजे पाणी टंचाईमधून मिळालेली सुटका, तुंबलेली मुंबई आणि बरचं काही... सुरभीसाठी (आर्वी) पाऊस म्हणजे ढगांची धावपळ, चिखल आणि सौंदर्य, प्रेम आणि मैत्रीचं प्रतिक म्हणजे पाऊस.
ओमप्रकाशने म्हणजेच मल्हार सांगतो, लक्ष्मी सदैव मंगलम् या मालिकेमधील एक सीन शूट सुरू असताना मढमध्ये खूप पाऊस आणि वारा सुरू होता. त्यामुळे रस्त्यावर एक मोठं झाड कोसळून पडलं होतं. रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. त्यामुळे आम्हाला सेटवर पोहचण शक्य नव्हतं. परिणामी शुटिंग कॅन्सल करावं लागलं. माझं लहानपण खेड्यात गेलं. तिकडे पावसाळ्यात शेतात चप्पल घालून चालणं अशक्य होतं. कारण इतका चिखल आणि ओली माती चपलेला चिकटायची की, वजनाने चपलेचे बेल्ट तुटायचे म्हणून मग आम्ही चप्पल न घालता शेतात फिरायचो, त्यात तळपायांना तो चिखल आणि ओली माती काही सुकी असं चिकटून त्याचीच एक जड चप्पल तयार व्हायची... हे मी कधीच विसरणार नाही. लक्ष्मी म्हणजेच समृद्धी लक्ष्मी सदैव मंगलम् या मालिकेच्या सेटवरील पाऊसाळ्याबद्दल सांगते, कधी कधी आम्ही सेटवर चहा आणि भजी मागवतो. तसेच मला सीन मधून वेळ मिळतो, तेव्हा मी पाऊसामध्ये भिजते तर सुरभी म्हणजे आपल्या लाडक्या आर्वीने देखील तिच्या आठवणी सांगितल्या, सायकल वरून जाताना रेनकोट न घालता आम्ही शाळेमध्ये जायचो. नागपूरमध्ये आम्ही फुटाळा तलावाजवळ खास भिजायला जायचो. पावसाळ्यामध्ये मिळणारा भुट्टा मला भयानक आवडतो... पावसाळ्यामध्ये मला कविता करायला आवडतात.