उडाण मालिकेत लीपनंतर प्रेक्षकांना पाहायला मिळणार या गोष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 02:13 PM2018-08-08T14:13:31+5:302018-08-08T14:14:36+5:30
आता उडाण ही मालिका सात वर्षांचा लीप घेत असून चकोरची मुलगी अंजोरचा प्रवास आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकमेकांना ओळखत नसल्यामुळे आता अंजोरचे इमलीकडून अपहरण केले जाणार आहे.
वेठबिगार असलेल्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेतलेली चकोर एक स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. सगळ्या गोष्टी नशिबावर सोडणे तिला पटत नसल्याने तिने वेठबिगारीचे काम न करता आपला वेगळा मार्ग निवडला. आता उडाण ही मालिका सात वर्षांचा लीप घेत असून चकोरची मुलगी अंजोरचा प्रवास आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकमेकांना ओळखत नसल्यामुळे आता अंजोरचे इमलीकडून अपहरण केले जाणार आहे.
अंजोर चकोर प्रमाणेच प्रामाणिक आणि निश्चयी आहे. एका एनजीओ मध्ये शिक्षिका म्हणून काम करणारी चकोर विद्यार्थ्यांच्या गटातील एक विद्यार्थिनी म्हणून अंजोरला भेटणार आहे. चकोर आणि अंजोरला जरी त्यांचे नाते माहीत नसले तरी त्या दोघींमध्ये प्रेम आणि एकमेकांविषयीचा आदराचे बंध तयार होणार आहेत.
कथा पुढे अजूनच इंटरेस्टिंग होत जाणार असून सूरजचा भाऊ घुमान सिंग (मोहम्मद नजीम) आणि इमली सूरजचे साम्राज्य उधळून लावण्यासाठी एकमेकांशी हातमिळवणी करणार आहेत. त्याच्या भूमिकेविषयी बोलताना मोहम्मद नजीम सांगतो, “ उडान हा टेलिव्हिजनवरील दीर्घकाळ चालणारा शो आहे आणि तो प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे, त्यामुळे मी त्यात सहभागी झालो आहे. घुमान सिंगचे पात्र मी याआधी साकारलेल्या इतर पात्रांपेक्षा वेगळे आहे. मी प्रथमच नकारात्मक भूमिका साकारत आहे. या मालिकेमुळे माझ्या अभिनय कौशल्याला आव्हान देणारी भूमिका साकारण्याची मला संधी मिळाली आहे. या भूमिकेसाठी माझा विचार केल्याबद्दल मी कलर्स वाहिनीचा आणि या मालिकेच्या टीमचा आभारी आहे.”
उडाण मालिकेच्या लीपविषयी या मालिकेत चकोरची भूमिका साकारणारी मीरा देवस्थळी सांगते, “चकोरने नेहमीच संघर्ष केला आहे आणि ती चुकीच्या गोष्टींविरोधात लढली आहे. मालिकेने लीप घेतल्यानंतर चकोरची एक नवी बाजू प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे, ज्यात ती एक वेगळीच व्यक्ती बनलेली प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि तिचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जास्त गंभीर होणार आहे. तिच्या आयुष्यातील सर्व अनपेक्षित परिस्थितीमुळे तिच्या व्यक्तिमत्वात तो बदल झाला आहे. एक अभिनेत्री म्हणून अशी हरहुन्नरी भूमिका साकारायला मिळाली म्हणून मला धन्य वाचत आहे. लवकरच उलगडणाऱ्या या नव्या कथेची मी आता वाट पाहात आहे.”