अभिनयाचे विविध अंग शिकले-सृष्टी पगारे
By अबोली कुलकर्णी | Published: October 4, 2019 07:00 AM2019-10-04T07:00:00+5:302019-10-04T07:00:02+5:30
गोड आवाज आणि हसरा चेहरा असलेली छोटी गायिका सृष्टी पगारे ही कलर्स मराठी वाहिनीवर ‘स्वामिनी’ या मराठी मालिकेत रमाबाईंच्या भूमिकेत दिसत आहे. या वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या सांगितीक रिअॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक होती. सृष्टी ही मुळ नाशिकची रहिवासी आहे.
अबोली कुलकर्णी
गोड आवाज आणि हसरा चेहरा असलेली छोटी गायिका सृष्टी पगारे ही कलर्स मराठी वाहिनीवर ‘स्वामिनी’ या मराठी मालिकेत रमाबाईंच्या भूमिकेत दिसत आहे. या वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या सांगितीक रिअॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक होती. सृष्टी ही मुळ नाशिकची रहिवासी आहे. मालिकेत पेशव्यांच्या काळातील सत्ता आणि संसार, कौटुंबिक कलह, कटकारस्थाने, राजकारणी डावपेच हे सर्व पाहायला मिळत आहे. या मालिकेच्या निमित्ताने सृष्टी पगारे हिच्याशी साधलेला हा संवाद...
* सृष्टी, ‘स्वामिनी’ ही तुझी पहिलीच मालिका आहे. तू या भूमिकेसाठी कशी तयारी केलीस?
- मला रमाबाईंचे पात्र खूप आवडते. या मालिकेची ऑफर आली तेव्हा मला खूप आनंद झाला. रमाबाईंच्या भूमिकेसाठी मी अनेक ऐतिहासिक साहित्य वाचले, चित्रपट पाहिले. यातून मला या भूमिकेच्या विविध छटा समजल्या. मी काही दिवस अभिनयाचे वर्क शॉपही केले.
* तुला आम्ही ‘सूर नवा ध्यास नवा’ छोटे सूरवीर मध्ये पाहिलं होतं. अनेकांना तुला अशा गेटअपमध्ये पाहिल्यावर धक्का बसला. एवढा बदल कसा केलास?
- गायनासाठी मला फार काही अभिनय करावा लागत नाही. पण, मालिकेसाठी अभिनय करताना मला खूप मजा येते. अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळतात. माझ्या स्वत:मध्ये झालेला बदल हा खूप स्वागतार्ह आहे.
* मालिकेत १६व्या शतकातील राहणीमान, बोलणं-चालणं चित्रीत करण्यात आलं आहे. हे तू कसे शिकलीस?
- ही गोष्ट काहीशी कठीण होती माझ्यासाठी. पण, मी केलेल्या वर्कशॉपमध्ये गिरीजा मॅडमनी अनेक शब्दांचे उच्चार शिकवले. मी इंग्रजी माध्यमात शिकत आहे. त्यामुळे मला मराठीतील काही शब्द कठीण गेले. मात्र, तरीही सरावाने मी त्यावर मात केली.
* सेटवरचं वातावरण कसं असतं?
- मी, चिन्मय दादा आणि ऐश्वर्या ताई आम्ही सेटवर खूप धम्माल करतो. मला चिन्मय दादा आणि ऐश्वर्या ताई कसा अभिनय करायचा? कसं बोलायचं? हे सर्व शिकवतात. सगळे जण माझे सेटवर खूप लाड करतात.
* तुझ्या घरच्यांचा तुला कसा सपोर्ट असतो?
- मला माझ्या घरच्यांकडून पूर्ण पाठिंबा असतो. माझी आई, बाबा आणि दीदी सगळे जण मला सर्व काही शिकवतात. एखादी गोष्ट मला समजली नाही तर मला ते समजावून सांगतात.
* मालिकेच्या शूटिंगमुळे आता अभ्यासाला, खेळायला वेळ मिळतो का?
- होय, मालिकेचे शूटिंग आणि माझा अभ्यास सांभाळून मी खेळण्यासाठी वेळ काढते. सेटवर गंगा ताई, रामचंद्र हे सगळे जे मालिकेत माझे भाऊ-बहीण आहेत, त्यांच्यासोबत मी खेळते.