शिक्षण घेऊन कुठे अभिनय करता येतो का? सिक्स पॅक अभिनेत्याच्या चेहऱ्यावर असायला हवेत: अशोक सराफ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 09:32 AM2022-07-19T09:32:49+5:302022-07-19T09:33:51+5:30
अभिनय कला ही उपजत असावी लागते. अभिनेत्याकडे कल्पनाशक्ती आणि निरीक्षणशक्ती चांगली असावी लागते, असे अशोक सराफ यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अभिनय शिक्षण घेऊन येतो, यावर माझा विश्वास नाही, अन्यथा सगळे शिक्षण घेणारे हे टॉपचे अभिनेते झाले असते. अभिनय कला ही उपजत असावी लागते. अभिनेत्याकडे कल्पनाशक्ती आणि निरीक्षणशक्ती चांगली असावी लागते, असे मत सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांनी सोमवारी व्यक्त केले. सिक्स पॅक हे अभिनेत्याच्या चेहऱ्यावर असायला हवेत, असा टोला शरीरयष्टीच्या जोरावर चित्रपटात येणाऱ्या कलाकारांना त्यांनी लगावला.
मराठी ग्रंथ संगहालय, ठाणे, अ.भा. मराठी नाट्य परिषद, ठाणे, स्वा.वि.दा. सावरकर प्रतिष्ठान, ठाणे आणि ग्रंथाली प्रकाशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सराफ यांचा सोमवारी जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या नाट्य, चित्रपट, मालिका व लेखन प्रवासाचा लेखाजोखा ‘अशोक एक बहुरूपी’ या कार्यक्रमातून उलगडला. अभिनेते विघ्नेश जोशी यांनी त्यांना बोलते केले. रंगभूमीवर पहिले पाऊल वयाच्या सातव्या वर्षी पडले. त्याच वर्षी एकांकिकेत मला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून रौप्य पदक मिळाले. तेव्हा मला आपल्याला अभिनय येतो, असे वाटू लागले.
सराफ म्हणाले की, नाटकाची तालीम सुरू असताना, मला कोणीही हसलेले आवडत नाही. ज्यावेळी नट हसतो, त्यावेळी तो त्याच्या भूमिकेतून, कलेतून बाहेर जातो. तालमीत फक्त नाटकाचा विचार असावा. ‘तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये फार उशिरा आला,’ ही राजा परांजपे यांनी दिलेली दाद कायम स्मरणात राहिली.
सराफ म्हणाले की, मला आतून जे वाटले, ते मी सादर केले, मला कोणत्याही दिग्दर्शकाने हे असे कर, म्हणून सांगितले नाही. मी वेगवेगळ्या भूमिका कशा मिळतील, यासाठी प्रयत्न केला. मराठी प्रेक्षकाला विनोद चांगलाच कळतो, म्हणूनच मराठीतील विनोद हे अधिक प्रगल्भ आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी अध्यक्ष विद्याधर ठाणेकर, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, विनायक गोखले, केदार बापट उपस्थित होते.
- शाहरुख खानसोबत चित्रपट करताना आलेल्या अनुभवाबद्दल सराफ म्हणाले की, शाहरुख खान कधीही स्वस्थ बसणारा अभिनेता नाही. मेहनत करायची तयारी असते. अशी माणसे उगाच स्टार होत नाहीत. तो स्वत:च्या मेहनतीने सुपरस्टार झाला आहे.
- लक्ष्मीकांत बेर्डे यांना माझ्याबद्दल आदरयुक्त भीती होती. माझा टायमिंग, सूर, लय, थ्रो त्यांनी आत्मसात केला होता, म्हणून आमची जोडी यशस्वी झाली, अशा शब्दांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
- माझ्या गाण्यांवर मिम्स बनविणाऱ्यांचे मी कौतुक करतो आणि मीही ते तितक्याच आवडीने पाहतो, असे सराफ यांनी नमूद केले.
- ठाण्यातील नाट्यरसिक हा चोखंदळ आहे, मला त्यांचे नेहमीच कौतुक वाटते, असेही ते म्हणाले.