आव्हानांशिवाय आयुष्यात मजा नाही- अभिनेता रवी दुबे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 01:42 PM2018-05-17T13:42:58+5:302018-05-18T17:20:03+5:30
अबोली कुलकर्णी गुड लुकिंग अॅण्ड हॅण्डसम हंक म्हणून आपण टीव्ही इंडस्ट्रीतील काही मोजक्या अभिनेत्यांनाच ओळखतो. त्यातलं एक नाव म्हणजे ...
गुड लुकिंग अॅण्ड हॅण्डसम हंक म्हणून आपण टीव्ही इंडस्ट्रीतील काही मोजक्या अभिनेत्यांनाच ओळखतो. त्यातलं एक नाव म्हणजे रवी दुबे. अभिनयासोबतच त्याच्या लूक्सवर अनेक तरूणी अक्षरश: फिदा असतात. ‘यू आर माय जान’ आणि ‘३ देव’ सारख्या चित्रपटांत झळकलेला अभिनेता रवी दुबे आता पुन्हा एकदा त्याच्या अदाकारीने प्रेक्षकांना घायाळ करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो लवकरच स्टार प्लस वाहिनीवरील ‘सबसे स्मार्ट कौन’ या शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्याशी याविषयी मारलेल्या गप्पा...
* ‘सबसे स्मार्ट कौन’ या शोविषयी काय सांगाल? या शोमध्ये काय स्पेशल आहे?
- आत्तापर्यंत जनरल नॉलेजवर आधारित बरेच गेम शोज छोट्या पडद्यावर झाले आहेत. मात्र, हा गेम शो अगदीच वेगळा आहे. यात तुम्हाला तुमच्यातील जनरल नॉलेजपेक्षा तुम्ही किती स्मार्टपणे हा गेम खेळता? हे जास्त महत्त्वाचे आहे. तुम्ही स्मार्टली कसे निर्णय घेता? हे देखील यात समजणार आहे.
* तुम्ही होस्ट करत असलेल्या या शोच्या संकल्पनेविषयी काय सांगाल?
- या शोची मुख्य संकल्पनाच ही आहे की, तुम्ही जेवढ्या स्मार्टपणे निर्णय घ्याल तेवढंच तुम्हाला जास्त पैसा घरी घेऊन जाता येऊ शकतो. त्यामुळे हा शो आता सर्वसामान्य असलेल्या प्रत्येकालाच खुणावतो आहे. जेवढे फास्ट तुमचे निर्णय तेवढेच तुमचा गल्ला जमत जाणार आहे.
* तुमचा लूक आणि वेशभूषा यांच्याविषयी खूप चर्चा सुरू आहे. शोसाठी किती उत्सुक आहात तुम्ही?
- मी सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे, याचा मला नक्कीच आनंद आहे. यातील माझ्या लूक आणि वेशभूषेची चर्चा तर जोरदार सुरू आहे. लवकरच आता मी प्रेक्षकांसमोर येणार आहे, याचा मला आनंद आहे.
* तुमची पत्नी सर्गुन मेहता इंडस्ट्रीत आहे. एकमेकांसाठी एवढ्या बिझी शेड्यूलमधून वेळ कसा काढता?
- वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो. आम्ही दोघेही बिझी असलो तरीही आम्ही आमच्या व्यक्तिगत आयुष्यासाठी वेळ काढतोच. दिवसांत २४ तास असतात त्यातून तर आम्ही एकमेकांसाठी काही वेळ काढूच शकतो.
* तुम्ही बऱ्याच टीव्ही शोज, रिअॅलिटी शोजध्ये काम केले आहे. काय वाटते रिअॅलिटी शोजमुळे खरं टॅलेंट समोर येते का?
- नक्कीच येते. कारण रिअॅलिटी शोजमध्ये बरेच स्पर्धक असेही असतात जे खूप स्ट्रगल करून आलेले असतात. त्यामुळे कदाचित आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूही शकणार नाही. मात्र, अशा शोजमुळे आपण हे छुपं टॅलेंट सर्वांसमोर आणू शकतो. मी स्वत: देखील या रिअॅलिटी शोजचा भाग होतो.
* ‘यू आर माय जान’ और ‘३ देव’ या चित्रपटांमध्ये तुम्ही काम केलं आहे. टीव्ही की चित्रपट कोणत्या प्रकारात तुम्ही स्वत:ला कम्फर्टेबल मानता?
- मी खरंतर मला ज्याप्रकारचं काम मिळेल त्यानुसार स्वत:ला कम्फर्टेबल करतो. माझ्यासाठी अभिनय जास्त महत्त्वाचा आहे, मग तो कुठेही करावा लागला तरी माझी काहीही हरकत नसते. टीव्ही आणि चित्रपट या दोन्ही माध्यमांच्या मध्ये मी स्वत:ला पाहतो. मला आयुष्यात आव्हानं स्विकारायला प्रचंड आवडतात.