"हावरटासारखं गाणं जगून घेतलं..."; 'सूर नवा ध्यास नवा शो'मधून बाहेर पडल्यानंतर समीर परांजपेची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 01:24 PM2023-12-11T13:24:52+5:302023-12-11T13:25:26+5:30
Sur Nava Dhyas Nava : ‘सूर नवा ध्यास नवा’ शोमध्ये स्पर्धक म्हणून ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील अभिमन्यू म्हणजेच अभिनेता समीर परांजपे सहभागी झाला होता. त्याने आपल्या सुरेल स्वरांनी परीक्षकांसह श्रोत्यांची मनं जिंकली. मात्र नुकताच समीर या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरूणाईचा’(Sur Nava Dhyas Nava)ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या शोमध्ये स्पर्धक म्हणून ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील अभिमन्यू म्हणजेच अभिनेता समीर परांजपे सहभागी झाला होता. त्याने आपल्या सुरेल स्वरांनी परीक्षकांसह श्रोत्यांची मनं जिंकली. मात्र नुकताच समीर या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्याबरोबर श्रृती जय ही देखील बाहेर पडली. त्यानंतर समीरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत.
समीर परांजपेने सूर नवा ध्यास नवा शोमधील फोटोंचा कोलाज शेअर करत लिहिले की, आयुष्यात एखादी प्रिय गोष्ट काही कारणांनी करायची राहून गेली की ती राहूनच जाते म्हणतात आणि फक्त दिवसेंदिवस आपल्यातलं आणि त्या गोष्टीतलं अंतर वाढत राहतं,आणि आपण असहाय्यपणे फक्त बघत राहतो हळहळत राहतो.. कट्ट्यावर वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीप्रमाणे २-४ मित्रांच्या टोळक्यात आपल्या गुरूने दिलेल्या शिदोरीवर पोसलेल्या कलेची चमक दाखवून वाह वाह मिळवत राहतो आणि अरे लेका तू हे सीरियसली करायला हवं होतंस नाव काढलं असतंस हे ऐकून उगाचंच खूष होत राहतो.हे सगळं मी ही अनुभवलं आहे.पण अशीच एखादी राहून गेलेली गोष्ट फिरून परत आली तर? त्या वेळी राहून गेलं होतं काही कारणांनी म्हणतोस ना चल आता संधी आहे आता काय कारण देतोस बोल असे नियातीनेच पत्ते पिसले तर?? मी ही तेच केलं.. हावरटा सारखं गाणं जगून घेतलं.
तो पुढे म्हणाला की, सूर नवा ध्यास नवा च्या निमित्ताने पुन्हा गाणं करण्याची संधी मला दिलीत या साठी सर्वप्रथम कलर्स मराठीचे खूप आभार. कलर्स मराठी ची सगळी टीम प्रथमेश देसाई, सुगंधा लोमीकर, प्रिया,शंतनु राम तुम्ही दाखवलेल्या विश्वासामुळे मी गाऊ शकलो. एकवीरा प्रॉडक्शनची सगळी टीम. गिरीजा गुप्ते, अविभान, विलास श्रीपत, ओमकार मोरजकर तुमचे ही खूप आभार फार मजा आली. आमचे मेंटॉर संपदा बांदोडकर, चिंतामणी सोहोनी तुमचे विशेष आभार..सीन बसवण्याची सवय असेलेल्या मला गाणं कसं बसवायचं हे तुम्ही शिकवलंत. आमचे सगळे म्युझिशियन आणि त्यांचे कॅप्टन मिथिलेश पाटणकर दादा तुम्ही वेळोवेळी केलेल्या सूचना आणि तू मस्त गा ऐनवेळी काही झालंच तर "कॅच" पकडायला आहोत आम्ही ह्या दिलेल्या विश्वासामुळे मी बिनधास्तपणे गाऊ शकलो. अजित परब दादा तुमच्याकडून काव्य/ कविता/ गाणं कसं वाचावं हे शिकायला मिळालं. चाल बसली आहे आता "शब्द गा" ही तुम्ही केलेली सूचना कायम लक्षात राहील आणि कायम मी तो प्रयत्न करेन. रसिका सुनील तूही सूर नवा चा प्रवास माझ्यासारखाच "जगतीयेस". बोल्ड बिनधास्त ब्युटीफुल आणि उत्तम अभिनेत्री मागची हळवी कलाकार मला कळली आणि खूप भावली. आपली मैत्री इथून सुरू झाली आहे ती अशीच राहील याची खात्री आहे.माझ्या सगळ्या स्पर्धक मित्रांनो तुमच्या कडून ही खूप गोष्टी शिकलो. तुम्ही सगळे कमाल आहात. गाते रहो.
''माझा वनवास संपवलात यासाठी कायम ऋणात राहीन...''
समीरने आणखी एक पोस्ट शेअर करत म्हटले की, सूर नवा चे आमचे लाडके परीक्षक अवधूत गुप्ते. काय बोलू मी दादा..नारायणा नंतरची मिठी कायम लक्षात राहील..तुमची शिट्टी आणि पार बुक्का पाडलास मित्रा हे ऐकलं की काय आनंद होतो सांगू..महाराष्ट्राचा रॉकस्टार गायक संगीतकार आणि दिग्दर्शक म्हणून आमचं मन तूम्ही जिंकले आहेच.. परीक्षक म्हणून ही तुम्ही आम्हा सगळ्यांचे लाडके आहात पण इथे शूटींग सुरू होण्याआधी ज्या आत्मीयतेने तूम्ही सगळ्या स्पर्धकांची चौकशी करायचात, तब्येत वैगरे ठीक आहे ना विचारायचात, बाहेरगावाहून आलेल्या आणि स्पर्धेसाठी इकडे मुंबईत राहत असलेल्या स्पर्धकांना राहता तिथे काही अडचण नाही ना, सगळं नीट वेळच्या वेळी मिळतंय ना काहीही अडचण असेल तरी डायरेक्ट मला सांगा म्हणायचात.. तेव्हा मला कळलं कुठल्याही गाण्यातला भाव तुम्ही इतक्या ताकदीने पेश कसं करू शकता.. तुमचं "माणूसपण" तुमच्या प्रत्येक गाण्यात उतरतं बहुदा परीक्षक म्हणून तुम्ही दिलेल्या कॉमेंट्स मधून तर शिकलोच पण माणूस म्हणून ही खूप काही शिकवलंत..खूप प्रेम.. आणि माझा वनवास संपवलात या साठी कायम ऋणात राहीन.
महेश काळे दादा गाण्यानंतरच्या तुमच्या सूचना कमेंट्स ह्या लाख मोलाच्या असतातच. त्याचे आम्ही स्पर्धकच नाही तर प्रेक्षक ही फॅन आहेत .पण कला ही साधना आहे आणि साधनेची शुचिर्भूतता कशी राखावी कलेशी एकनिष्ठ कसं राहावं, मेहनतीतून काय साधायचं आणि काय भेदायचं शिकवलंत.. तुम्ही गाता तेंव्हा अभिनेता गातोय असं वाटत नाही गाण्यावर जरूर मेहनत घ्या रियाजाची शिदोरी वाढवा मी तुम्हाला मदत करेन हे तुम्ही म्हणालात हे मला कायम आठवण करून देत राहील की मला गाणं करायचं आहे मेहनत घ्यायची आहे.तुमचे ही खूप आभार. आणि सगळ्यात शेवटी रसिकप्रेक्षक, खरंतर मनात खूप भीती होती प्रेक्षक गायक म्हणून स्वीकारतील का? अरे हा अभिनेता आहे ह्याला उगाच आणलंय स्पर्धेत असं तर म्हणणार नाहीत ना.. पण तुम्ही प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रेम, शुभेच्छा दिल्या.. माझ्या प्रामाणिक प्रयत्नांना दाद दिलीत आणि गायक म्हणूनही मला स्वीकारलं त्यासाठी तुमचे ही आभार. असंच प्रेम आणि आशीर्वाद देत रहा, असे त्याने पोस्टमध्ये म्हटले.