'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?', मुंबईतील पोस्टर्सचं गुपीत अखेर उघड; पुन्हा येताहेत 'लोकमान्य'!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 11:26 AM2022-11-21T11:26:11+5:302022-11-21T11:28:11+5:30
मुंबईत ठिकठिकाणी 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' असा जाब विचारणारे पोस्टर्स लागले होते.
मुंबईत ठिकठिकाणी 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' असा जाब विचारणारे पोस्टर्स लागले होते. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थिती पाहता या पोस्टर्सनं लक्ष वेधून घेतलं नसतं तर नवलच. त्यामुळे या पोस्टर्सची जोरदार चर्चा सुरू झाली होती. ते नेमके कुणी लावले? आणि त्याचा नेमका अर्थ काय अशा चर्चा सुरू असताना आता यामागचं गुपीत अखेर उघड झालं आहे.
सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा रोखठोक सवाल विचारत इंग्रजांना जाब विचारणारे लोकमान्य गंगाधर टिळक यांच्या जीवनावर आधारित नवी मालिका झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लोकमान्य टिळकांच्या समृद्ध विचारांचा वारसा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि लोकमान्यांचे विचार आजच्या काळाशी कसे सुसंगत आहेत हे समजून सांगण्यासाठी त्यांच्यावर आधारित मालिका सुरू करण्याचा निर्णय झी मराठी वाहिनीनं घेतला. लोकमान्य नावाची ही नवी ऐतिहासिक चरित्रगाथा झी मराठी वाहिनीवर २१ डिसेंबरपासून भेटीला येत आहे. बुधवार ते शनिवारी रात्री साडेनऊ वाजता 'लोकमान्य' ही मालिका पाहता येणार आहे.
टिळकांच्या राजकीय प्रवासाबरोबरच त्यांच्या कौटुंबिक आयुष्यातील महत्त्वाचे घटना-प्रसंग या मालिकेत पहायला मिळणार आहेत. टिळकांचा विवाह, त्यांचे महाविद्यालयीन जीवन, त्यांचे विविधांगी लेखन, राजकीय स्तरावरील त्यांच्या कारकिर्दीचे महत्त्वपूर्ण टप्पे या मालिकेतून प्रेक्षकांना पहायला मिळतील. आशुतोष परांडकर हे या मालिकेचे लेखक आहेत. तर स्वप्निल वारके हे दिग्दर्शक आहेत. दशमी क्रिएशन्स हे या मालिकेचे निर्मिते आहेत. अभिनेता क्षितीज दाते लोकमान्य टिळकांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री स्पृहा जोशी देखील प्रमुख भूमिकेत असणार आहे.