उत्कृष्ट अभिनेत्री बनण्याचा ध्यास!-अभिनेत्री गायत्री दातार
By अबोली कुलकर्णी | Published: October 24, 2018 01:20 PM2018-10-24T13:20:02+5:302018-10-24T13:21:42+5:30
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ ही मालिका टीआरपीचे अनेक विक्रम मोडत आहे. विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर यांची ही अनोखी प्रेमकहानीवर प्रेक्षक फिदा आहेत. अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री गायत्री दातार हे दोघे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत असून छोटया पडद्यावर त्यांना प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे.
अबोली कुलकर्णी
‘पुढच्या पाच वर्षांत मला एक उत्कृष्ट अभिनेत्रीबरोबरच एक चांगली व्यक्ती बनायचं आहे’, असे मत ‘तुला पाहते रे’ फेम इशा अर्थात गायत्री दातार हिने मुलाखतीदरम्यान व्यक्त केले. झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ ही मालिका टीआरपीचे अनेक विक्रम मोडत आहे. विक्रांत सरंजामे आणि इशा निमकर यांची ही अनोखी प्रेमकहानीवर प्रेक्षक फिदा आहेत. अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री गायत्री दातार हे दोघे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत असून छोटया पडद्यावर त्यांना प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी साधलेला हा संवाद...
* ‘तुला पाहते रे’ मालिका सध्या प्रचंड गाजतेय. कसं वाटतंय?
- खुप छान वाटतंय. फार कमी कालावधीत मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. कलाकारांसाठी प्रेक्षकांचे प्रेम खूप महत्त्वाचे असते. रस्त्यात येता-जाता मला लोक आता ओळखू लागले आहेत यामुळे तर खूप मस्त वाटतं. टीआरपी देखील वाढला आहे. मी झी मराठीचे आभार मानीन कारण त्यांच्यामुळेच मला ही एवढी मोठी संधी मिळाली. त्याशिवाय सुबोध भावे आणि संपूर्ण टीम मला खूप सांभाळून घेते त्यामुळे मजा येते सेटवरही आम्ही खूप मजा करतो.
* एक वेगळं कथानक आणि हटके जोडी हे मालिकेचं शक्तीस्थान. तुझ्याकडे प्रस्ताव आला तेव्हा तुझी रिअॅक्शन काय होती?
- मी जेव्हा आॅडिशन दिले तेव्हा मला अगदीच माहित नव्हतं की, मी कोणत्या मालिकेसाठी काम करणार आहे? पण, मी जेव्हा स्क्रिप्ट वाचली, स्टारकास्ट पाहिले तेव्हा माझं स्वप्न खरं झालं. कारण सुबोध भावे यांच्यासोबत काम करणं हेच तर माझं स्वप्न होतं. ते या निमित्ताने पूर्ण होताना मी बघणार आहे. सुबोध भावे, झी मराठीचं बॅनर आणि एवढी सुंदर मालिकेची टीम यांच्याच खरंतर मी प्रेमात पडले होते.
* सुबोध भावे एवढ्या मोठया मराठी कलाकारासोबत पहिलीच मालिका आणि झी मराठीसारखं मोठं बॅनर दडपण आले का?
- अर्थात, मला दडपण आलं होतं. कारण आमची जेव्हा मालिकेविषयी पहिली मीटिंग झाली तेव्हा तिथे सुबोध भावे आले तेव्हा मला खरंच वाटेना की, याच्यासोबत आपल्याला काम करायचे आहे. मात्र, जेव्हा कळालं तेव्हा मला प्रचंड आनंद झाला. तो मला खूप सांभाळून घेतो. तो बिल्कुल मला सीनियर म्हणून ट्रीट करत नाही. एखादी गोष्ट समजत नसेल तर कशी करायची ते सांगतो. त्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत आम्ही सेटवर खूप मजा, मस्ती करतो. शूटिंगचा प्रत्येक क्षण आम्ही एन्जॉय करतो.
* अभिज्ञा भावे म्हणजेच मायरासोबत तुझं फारसं पटत नसल्याचं आम्ही बघतो. पण, तुमचं आॅफस्क्रीन बॉण्डिंग कसं आहे?
- ती जशी पडद्यावर दिसते ती तशी बिल्कुलच नाहीये. तिच्यासोबत माझं खूप छान जमतं. ती सेटवर एक बास्केट घेऊन येत असते. ती जर शूटला येत असेल तर मी तिला मला कोणता पदार्थ खावा वाटतोय तो घेऊन यायला सांगते. मग ती माझ्यासाठी आठवणीने घेऊन येते. ती माझे प्रचंड लाड करते. एखाद्या लहान बहिणीसारखं ती माझ्यावर प्रेम करते.
* सुबोध भावे यांच्याकडून बक्षीस घेतानाचा तुझा लहानपणीचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. काय सांगशील?
- मी चौथीत असताना एका नाटकात छोटीशी भूमिका केली होती. तेव्हा मला त्याच्या हस्तेच बक्षीस मिळालं होतं. त्यावेळी मी त्याला म्हणाले होते की, मला तुझ्यासोबत काम करायचे आहे. तेव्हा त्याने मला हसून दाद दिली होती. ते माझं स्वप्न खरं झालंच.
* इशा आणि गायत्री मध्ये किती साम्य आहे? गायत्री खऱ्या आयुष्यात कशी आहे?
- काही बाबतीत दोघींमध्ये साम्य आहे. इशाप्रमाणेच गायत्रीही सर्वांचं शांतपणे ऐकून घेते. कुणालाही उलट उत्तरं देणं इशाला जमत नाही. मात्र, गायत्री समोरच्या व्यक्तीला ठामपणे उत्तर देणंच पसंत करते. मी पूण्यात अॅडव्हेंचर स्पोर्टस इन्स्पिेक्टर म्हणून काम करत होते. त्यामुळे मला ट्रेकिंग, फिरायला जाणं अशा गोष्टी आवडतात. तसे इशाला जमत नाही. इशाला तेवढे एक्स्पोजर देखील मिळालेले नाही.
* बिझी शेड्यूलमधून स्वत:साठी वेळ कसा काढतेस?
- मी करतेय ते कामच माझ्यासाठी खूप एन्जॉयेबल आहे. मला कधीही बोअर होत नाही. त्यामुळे वेगळे असे काहीही करावेसे वाटत नाही. आई-बाबा, भाऊ माझे पूण्यात असतात. त्यांना मी रोज रात्री फोन करून बोलतेच. त्याशिवाय २,३ दिवस सुट्टया आल्या की, मी पूण्याला जातेच.
* अशी कुठली गोष्ट आहे जी तू मिस करतेस?
- ट्रेकिंग अर्थात. कारण गेल्या ३ महिन्यांपासून मी क ेवळ शूटिंग एके शूटिंगच करत आहे. मला एकही संधी मिळाली की, मी लगेचच ट्रेकिंगला जाणार आहे, एवढे मात्र नक्की.
* तुझा फिटनेस फंडा काय आहे?
- मी जंक फूड खात नाही. रोजची घरगुती भाजी -पोळी मी खाते. याशिवाय जीमशिवाय काहीही करणं सध्या शक्य होत नाही. मी ज्या बिल्डिंगमध्ये राहते तिथे मी दिवसातून ४ ते ५ वेळेस पायऱ्या उतरते आणि चढते. त्यामुळे तेवढाच मला काही हालचाल राहावी, या उद्देशाने मी करते.
* तू स्वत:ला पुढच्या ५ वर्षांत कुठे पाहतेस?
- मला एक चांगली अभिनेत्रीबरोबरच एक चांगली व्यक्ती म्हणून प्रेक्षकांनी ओळखावं, हीच माझी इच्छा आहे. मी स्वत:ला पुढच्या ५ वर्षांत एक चांगली अभिनेत्री झालेलं बघू इच्छिते.