नव्या भूमिकेच्या शोधात असतो-अभिनेता सुमीत राघवन
By अबोली कुलकर्णी | Published: October 30, 2018 05:09 PM2018-10-30T17:09:15+5:302018-10-30T17:14:09+5:30
‘महाभारत’,‘तू तू मैं मैं’,‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ यासारख्या मालिकांमध्ये उत्कृष्ट भूमिका रंगवणारा अभिनेता म्हणून सुमीत राघवन याने इंडस्ट्रीत ओळख निर्माण केली. आता सुमीत राघवन डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘जबान संभाल के’ ही वेबसीरिज घेऊन येत आहे.
अबोली कुलकर्णी
‘बकेट लिस्ट’, ‘माय नेम इज खान’,‘ हॉलीडे’ अशा सिनेमांमध्ये तर ‘महाभारत’,‘तू तू मैं मैं’,‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ यासारख्या मालिकांमध्ये उत्कृष्ट भूमिका रंगवणारा अभिनेता म्हणून सुमीत राघवन याने इंडस्ट्रीत ओळख निर्माण केली. आता सुमीत राघवन डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘जबान संभाल के’ ही वेबसीरिज घेऊन येत आहे. नव्वदीच्या दशकांत पंकज कुमारच्या मुख्य व्यक्तीरेखेतील ही मालिका प्रचंड गाजली. आता हीच मालिका नव्या ढंगात सुमीत राघवन त्याच्या टीमसह रंगवणार आहे. यानिमित्ताने त्याच्याशी मारलेल्या या दिलखुलास गप्पा...
* ९०च्या दशकांत प्रचंड गाजलेली सीरियल ‘जबान संभाल के’ आता पुन्हा एकदा नव्या कलाकारांसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काय सांगशील? किती उत्सुक आहेस?
- मी खूप उत्सुक आहे. खरंतर प्रेक्षकांना ‘जबान संभाल के’ चा हा नवा अंदाज नक्कीच आवडेल, अशी मला आशा आहे. नव्या पिढीसाठी तर ही नवीच मालिका आहे. नव्या पिढीला मालिकेकडून फारशा अपेक्षा नक्कीच नसतील. डिजिटल प्लॅटफॉर्मवर असल्याने नवी पिढीच ही मालिका जास्त प्रमाणात एन्जॉय करेल.
* पंकज कपूरची भूमिका तू करत आहेस. कधी दडपण आलं होतं का? कोणती विशेष तयारी तू केली आहेस?
- होय, मी पंकज कपूर यांनी साकारलेली मोहन भारती यांची भूमिका के ली आहे. विशेष तयारी काहीही करावी लागली नाही. फक्त पंकज कपूर आणि टीमने साकारलेला उत्तम अभिनय आम्हाला टिकवून ठेवायचा होता. खरंतर हेच एक आव्हान माझ्यासमोर होते.
* पाठशाला इज बॅक अशी शोची टॅगलाइन आहे. तर त्यामुळे तुला तुझ्या शाळेच्या काही गोष्टी आठवल्या का?
- नाही. तशा काही आठवणी नाहीत. कारण मी भूतकाळात रमणारा व्यक्ती नाहीये. मला वर्तमानातच जगायला आवडतं. येणारा प्रत्येक क्षण मी मनापासून एन्जॉय करतो. गेलेल्या दिवसाबद्दल फार विचार करत नाही.
* रूपाली भोसले आणि भक्तियार इराणी यांच्यासोबत तू पुन्हा एकदा काम करत आहेस, काय सांगशील?
- होय, आम्ही पुन्हा एकदा या शोच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत. रूपाली एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. ‘बडी दूर से आये हैं’ या मालिके साठी आम्ही दोन वर्ष एकत्र होतो. या शोमध्ये रूपालीने विद्यार्थिनीचे काम केले आहे. भक्तियारचे पण तसेच आहे. आम्ही एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवतो.
* आत्तापर्यंत तू अनेक विनोदी ढंगाच्या भूमिका केल्यास. किती वेगळी आहे ही भूमिका?
- खरंतर यात द्विअर्थी विनोदनिर्मिती करण्यात येते. मला फक्त कुणाच्या तरी बोलण्यावर रिअॅक्ट करायचं असतं. माझं पात्र फार बोलत नाही, मात्र, बाकीची पात्रं बोलतात. त्यांचं हिंदी कच्चं असल्याने त्यांनी एखादा शब्द उच्चारला की, त्याच्यातून विनोदनिर्मिती झाल्याशिवाय राहत नाही.
* तुझी कोणती मालिका तुला अशीच नव्या ढंगात बघायला आवडेल?
- मी फारसा त्यावर विचार केला नाही. पण, माझ्यासाठी रोल अधिक महत्त्वाचा आहे. मला या भूमिकेतून काय वेगळं करायला मिळेल, याचा मी अधिक विचार करतो. मी सध्या हॅम्लेट हे मराठी नाटक करतोय. त्यातून मला नवी ऊर्जा, नवा उत्साह मिळतो आहे. कॉमेडी न करता वेगळं काहीतरी करतोय याचा मला जास्त आनंद वाटतो आहे.
* हिंदी मराठीत दोन्हीकडे तू काम केलं आहेस, करत आहेस. कोणता फरक जाणवतो?
- खरंतर, अभिनय कलाकारासाठी सर्वांत महत्त्वाचा असतो. माध्यम फारसं मॅटर करत नाही. माझ्यासाठी भूमिका किती ताकदीची आहे, हे जास्त महत्त्वाचं असतं. त्यासोबतच माझं अर्थार्जन जर या भूमिकेच्या निमित्ताने चांगलं झालं तर मला जास्त आनंद होतो.
* एवढ्या बिझी शेड्यूलमधून स्वत:साठी वेळ कसा काढतोस?
- असं काही नसतं. माझ्याकडे वेळ असतो. कारण ‘जबान संभाल के’ चे भाग मी मागील वर्षी शूट केलेले आहेत. ‘काशीनाथ घाणेकर’ या चित्रपटाचीही शूटिंग मागील वर्षीच मी पूर्ण केली आहे. फक्त ‘हॅम्लेट’च्या प्रयोगावेळी मी थोडा व्यस्त असतो. बाकी मला वेळ मिळतो तेव्हा मला हव्या त्या गोष्टी करतो. आयुष्य एन्जॉय करतो.