रात्रीस खेळ चाले 2 मधील अण्णांची भूमिका साकारणाऱ्या माधव अभ्यंकर यांना भूमिकेसाठी करावी लागली ही मेहनत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 03:21 PM2019-04-29T15:21:51+5:302019-04-29T15:26:54+5:30
रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत आहे.
रात्रीस खेळ चाले ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून वर्ष झाले असले तरी या मालिकेतील दत्ता, अभिराम, छाया, सुषमा, पांडू या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या मालिकेला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहाता या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच रात्रीस खेळ चाले 2 प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला.
रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना आवडली आहे. पण त्याचसोबत या मालिकेतील अण्णा आणि शेवंता हे तर प्रेक्षकांचे जीव की प्राण झाले आहेत. या मालिकेमुळे त्या दोघांनाही चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग मिळाले आहे.
रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेत अण्णा नाईक ही भूमिका माधव अभ्यंकर साकारत आहेत. रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या पहिल्या सिझनमध्ये त्यांच्या वाट्याला खूपच छोटीशी भूमिका आली होती. पण या सिझनमध्ये ते महत्त्वाच्या भूमिकेत असून ही भूमिका साकारणे हे त्यांच्यासाठी खूपच आव्हानात्मक होते. माधव अभ्यंकर यांनी त्यांच्या या भूमिकेविषयी नुकतीच टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली.
या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, रात्रीस खेळ चाले या मालिकेतील अण्णा या भूमिकेसाठी मला वजन कमी करणे गरजेचे होते. मी केवळ महिन्याभरात सात ते आठ किलो वजन कमी केले. त्यासाठी मला डाएट करावे लागणार होते. मला डाएट प्लॅन आखून देण्यात आला होता आणि तोच मी फॉलो करत असे. मालिकेसाठी वजन कमी करण्यासोबतच एक मोठे आव्हान माझ्यासमोर होते आणि ते म्हणजे भाषा शिकण्याचे... रात्रीस खेळ चाले 2 या मालिकेतील संवादांमध्ये अनेक मालवणी शब्द वापरण्यात आले आहेत. त्यामुळे या भाषेवर मला मेहनत घ्यावी लागली. माझी काकी मालवणी भाषेत बोलायची. त्यामुळे ही भाषा माझ्या कानावर पडलेली होती. पण मी अनेक वर्षं पुण्यात राहिलो असल्याने मला ही भाषा व्यवस्थित बोलता येत नव्हती. त्यामुळे मी अनेक मालवणी नाटकं बघितली आणि त्याचा भाषा सुधारण्यासाठी मला प्रचंड फायदा झाला.