'आई कुठे..'साठी मधुराणीचा होता नकार; 'या' एका कारणामुळे झाली मालिका करायला तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 12:26 PM2024-03-03T12:26:55+5:302024-03-03T12:27:17+5:30
Madhurani prabhulkar: मधुराणीला एका खास कारणामुळे या मालिकेत काम करायचं नव्हतं.
छोट्या पडद्यावर गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte). ही मालिका सुरु झाल्यापासून छोट्या पडद्यावर गाजत आहे. यात खासकरुन मालिकेतील अरुंधतीने तर प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतलं आहे. अरुंधती ही भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले (madhurani prabhulkar) हीने साकारली असून आज ती छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. यामध्येच आता या भूमिकेसाठी मधुराणीची निवड कशी झाली हे मालिकेच्या लेखिका रोहिणी निनावे (Rohini Ninawe) यांनी सांगितलं आहे.
कशी झाली मधुराणीची अरुंधतीसाठी निवड?
मधुराणी गोखले आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे रोहिणी यांनी तिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली. सोबतच मधुराणीची या मालिकेसाठी निवड कशी झाली हे सुद्धा तिने सांगितलं आहे. "आज मधुराणीचा वाढदिवस.. मधुराणी माझी खूप जवळची वगैरे मैत्रीण नाही ... पण मला ती आधीपासून आवडायची.. अगदी सात्विक गोड चेहरा.. वैविध्यपूर्ण कवितांमध्ये तिला असलेला रस आणि अत्यंत प्रभावी सादरीकरण यामुळे ती माझी आवडती होती.. आणि तिच्या छंदामध्ये ती रममाण झाली होती.. अशातच आई कुठे काय करते ही मालिका माझ्याकडे लिहायला आली होती .. तेव्हा त्या भूमिकेसाठी मधुराणी डोळ्यासमोर आली", असं रोहिणी यांनी म्हटलं आहे.
पुढे त्या म्हणतात, "निर्माते राजन शाही यांना मी तिचे फोटो दाखवले.. मधुराणीशी सुद्धा बोलले. कारण तिने एवढ्यात मालिकांमध्ये काम केले नव्हते.. तीन मोठ्या मुलांच्या आईची भूमिका करण्यास ती काहीशी चाचरत होती. अर्थात ती त्या वयाची नाहीच आहे. पण मी तिला समजावून सांगितलं की ही भूमिका अतिशय सुंदर असून यामध्ये अभिनयाला वाव आहे आणि एखाद्या चांगल्या मालिकेमध्ये मध्यवर्ती भूमिका केल्याने जी प्रसिद्धी तुला मिळेल त्याची तुला कल्पना सुद्धा नाही.. म्हणजे अभिनय केल्याचं आत्मिक समाधानही आणि प्रसिद्धीही. कदाचित तिला माझं म्हणणं पटलं असावं आणि तिने ही भूमिका करण्यास होकार दिला. नंतर ही मालिका किती लोकप्रिय झाली हे सगळ्यांना माहीतच आहे. काही कारणास्तव ही मालिका मी नंतर लिहिली नाही.. पण मधुराणीने ही भूमिका अमर केली याचा मला आनंद आहे.. मधुराणी आता पुन्हा आपल्या कविता वाचनाच्या आवडत्या छंदाकडे वळली आहे.. मधुराणी असंच तुला ज्यातून आनंद आणि यश मिळेल असं काम तुला मिळत राहो.. ही सदिच्छा !.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा".
मधुराणीने दिला होता मालिकेसाठी नकार
मधुराणीला ज्यावेळी अरुंधती ही भूमिका ऑफर झाली. त्यावेळी तिने सर्व प्रथम या भूमिकेसाठी नकार दिला होता. मधुराणीची लेक लहान असल्यामुळे तिने या मालिकेसाठी नकार दिला होता. लेकीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवता यावा यासाठी तिने हा नकार दिला होता. पण, तिच्या नवऱ्याला याविषयी कळल्यानंतर त्याने मधुराणीची समजूत घातली. त्यानंतर तिने मालिकेसाठी होकार कळवला.