केजरीवालांमुळे राजकारणात आला महाभारतातील ‘भीम’, वाचा त्याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 05:24 PM2020-04-28T17:24:09+5:302020-04-28T17:26:38+5:30
एक इंटरेस्टिंग किस्सा...
महाभारत ही मालिका पुन्हा सुरु झालीय़ अशात या मालिकेतील सर्व कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आहेत. आज आम्ही महाभारतात भीमाची भूमिका साकारणारे अभिनेते प्रवीण कुमार सोबती यांच्याबद्दल सांगणार आहोत. होय, महाभारत मालिकेपूर्वी त्यांनी काही चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका वठवली होती. अजूनही ते भीम म्हणूनच ओळखले जातात.
2013 मध्ये त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. त्यांची राजकारणात कशी एन्ट्री झाली, याचा एक इंटरेस्टिंग किस्सा आहे.
एका मुलाखतीत त्यांनी स्वत: याबद्दल सांगितले होते. खरे तर प्रवीण कुमार राजकारणात जराही इंटरेस्ट नव्हता. अॅक्टिंगनंतर ते घरी राहून आरामात आयुष्य जगत होते. एक दिवस ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी गेलेत. या भेटीत केजरीवाल यांनी प्रवीण कुमार यांना राजकारणात येण्याचा सल्ला दिला. मात्र प्रवीण कुमार यांनी लगेच नकार दिला. पण केजरीवाल यांनी त्यांची बरीच मनधरणी केली. राजकारणात चांगली माणसं येणार नसतील तर देशाचे भले कसे होणार? असा प्रश्न केजरीवाल यांनी त्यांना केला. त्यांच्या या प्रश्नाने प्रवीण कुमार यांना विचार करायला भाग पाडले आणि ते राजकारणात यायला तयार झालेत.
2013 मध्ये त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला आणि वजीरपूर मतदारसंघातून निवडणूक लढली. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. राजकारण प्रवीण कुमार यांना फारसे भावले नाही. राजकारणाइतके वाईट काहीही नाही. इथे लोक तुमच्या मागेपुढे फिरतात. कारण त्यांना तुमच्याकडून काम काढून घ्यायचे असते, असे प्रवीण कुमार या अनुभवानंतर एका मुलाखतीत म्हणाले होते. अर्थात यापश्चात 2014 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला.
राजकारण आणि अभिनय याशिवाय क्रिडा क्षेत्रात प्रवीण कुमार यांचे योगदान आहे. प्रवीण कुमार हे एथलिट असून त्यांना अर्जुन पुरस्कारही मिळाला होता. 1966 च्या एशियन गेम्समध्ये भारताने 5 गोल्ड आणि 5 ब्राँझ मेडल मिळवले होते. त्यातील दोन मेडल हे प्रवीण यांनी भारताला मिळवून दिले होते.