'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नाही तर 'हे' असतं कार्यक्रमाचं नाव, लेखक-दिग्दर्शकाने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 01:21 PM2023-11-03T13:21:50+5:302023-11-03T13:22:43+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली.
टीव्हीवरचा लोकप्रिय शो 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या शोमधील सर्वच कलाकार स्टार बनलेत. घराघरात हा कार्यक्रम आवर्जुन पाहिला जातो. कारण प्रत्येक कलाकाराचं वेगळं कौशल्य आहे. त्यांच्या विनोदांमुळे प्रेक्षक अगदी पोट धरुन खळखळून हसतात. पण सर्वांच्या लाडक्या या कार्यक्रमाचं नाव 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या आधी भलतंच ठरलं होतं.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशाबाहेरही या शोची क्रेझ पसरली. कलाकारांनी देशाबाहेर हास्यजत्रेचे कार्यक्रम गाजवले. समीर चौघुले, शिवाली परब, नम्रता संभेराव, वनिता खरात, प्रियदर्शिनी इंदलकरसह सर्वच कलाकारांनी आपल्या टॅलेंटने नाव कमावलं आहे. प्रत्येकाच्याच विनोदांचे रील्सही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
हास्यजत्रेचे लेखक आणि दिग्दर्शक सचिन मोटे आणि गोस्वामी यांनी नुकतंच भार्गवी चिरमुलेच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी एक खुलासा केला की या कार्यक्रमाचं नाव आधी महाराष्ट्राची हास्यजत्रा नाही तर भलतंच ठरलं होत. ते म्हणाले,"कार्यक्रमाचं नाव काय असावं यावर चर्चा करताना आधी 'कॉमेडीचे जहागीरदार' किंवा 'एकच पंच हादरुन टाकू मंच' याबाबत विचार झाला होता. नंतर काही दिवसांनी हसवण्याची जत्रा अशा आशयाचं नाव पाहिजे यावर विचार झाला. या जत्रेत अख्खा महाराष्ट्र आला पाहिजे म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा नावावर शिक्कामोर्तब झाला."