"आपला महाराष्ट्र पोकळ करू नका.."; मतदानानंतर उत्कर्ष शिंदेची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाला- "हाताला काम अन् कामाला दाम..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 04:31 PM2024-11-20T16:31:52+5:302024-11-20T16:33:40+5:30
लोकसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले होते.
Utkarsh Shinde: लोकसभा निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे (maharashtra Assembly Election 2024) वेध लागले होते. लोकसभेतील निकालांमुळे राज्यातील सर्वच पक्षांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली होती. आता मतदारराजा आपल्या पसंतीच्या उमेदवाराला विधानसभेत पाठविण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान, सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रिटींनी आपल्या कामकाजातून वेळ काढत मतदानाचा हक्क बजावला आहे. सोशल मीडियाद्वारे काही कलाकारांनी त्यांनी मतदान केल्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना आवाहनही केलं आहे.अशातच मराठमोळा गायक उत्कर्ष शिंदेने (Utkarsh Shinde) सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
उत्कर्ष शिंदेने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर मतदान केल्यानंतरचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहलंय, "हाताला काम ,आणि कामाला योग्य दाम जो देणार त्यालाच आम्ही मत देणार. स्वतःची मालमत्ता बळकट करण्यासाठी आपला महाराष्ट्र पोकळ करू नका, आणि उद्या निकाला नंतर परत नव्याने वेगळीच आघाडी वेगळीच युती करू नका म्हणजे झालं. आम्ही भारताचे लोक!" असं म्हणत उत्कर्षने शाब्दिक फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळतंय. सोशल मीडियावर उत्कर्षच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, आज महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होणार. लोकशाहीच्या या उत्सवात महाराष्ट्रातील प्रत्येक मतदाराने आपला हक्क बजावला पाहिजे, असं आवाहनही आयोगाकडून येत आहे. त्यामुळे मतदारांचा कौल नेमका कोणाला मिळणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.