लयभारी दोस्ता! आईच्या 11 वर्ष जुन्या साडीपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीकनं शिवला नवा कुर्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 05:48 PM2022-02-09T17:48:21+5:302022-02-09T17:51:07+5:30
Maharashtrachi Hasya Jatra actor Prithvik Pratap post : आईचा हा ठेवा आता तिचा मुलगा जपणार आहे...., वाचा, पृथ्वीकची पोस्ट, पाहा फोटो
2020 सालच्या दिवाळीला अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या आईच्या जुन्या साडीपासून स्वत:साठी व मुलांसाठी नवीन कुर्ते बनवून घेतले होते. आईच्या कपड्यांपासून बनवलेल्या या कपड्यांतील एक सुंदर व्हिडीओ रितेशने शेअर केला होता. आता एका मराठी अभिनेत्यानेही आईच्या जुन्या साडीपासून एक हटके ड्रेस शिवून घेतला आहे. होय, या अभिनेत्याचं नाव आहे पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap).
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम (Maharashtrachi Hasya Jatra ) पृथ्वीकने आईच्या जुन्या साडीचा वापर करत हटके कुर्ता व एक कोटी शिवून घेतली. याचे फोटो पृथ्विकने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
‘19 वर्षांपासून माझ्या सुंदर आईने बॉटल ग्रीन रंगाची एक सुंदर साडी जपून ठेवली होती. मी त्या साडीतून सुपर क्लासी कुर्ता व एक कोटी शिवून घेतली. आईची साडी आता तिचा मुलगा जपणार आहे,’असं कॅप्शन देत पृथ्विकने पोस्ट शेअर केली आहे. पृथ्विकने अलीकडे अभिनेता रौनक शिंदेच्या लग्नाला हजेरी लावली होती. या लग्नात पृथ्विक आईच्या साडीपासून बनवलेला सुंदर कुर्ता व कोटी घालून मिरवताना दिसला.
पृथ्वीकच्या आईच्या साडीपासून बनवलेल्या कपड्यांतील फोटोंवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. नट म्हणून तू आमचा लाडका होतासच. पण आज माणूस म्हणून जे तू करून दाखवले आहेस, त्याला मानाचा मुजरा. बाकी कुर्ता एक नंबर दिसतोय आणि या कुर्त्यात तू आणखी शोभून दिसतोयस, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. अनेकांनी खूप मस्त, भारी अशी कमेंट केली आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे घराघरात पोहचलेला विनोदी अभिनेता पृथ्वीक प्रताप काम करताना आपल्या वडिलांचं नाव लावतो. मात्र त्याचं पूर्ण नाव आहे. पृथ्वीक प्रताप कांबळे असं आहे. आंतरमहाविद्यालयीन एकांकिकापासून त्यानं अभिनयाला सुरुवात केली. पुढे यूथ फेस्टिव्हल, पथनाट्य, एकांकिका स्पर्धा, व्यावसायिक नाटक, हास्यजत्रा अशा विविध ठिकाणी त्यानं अभिनय कौशल्याची कमाल दाखवली. काही काळ त्यानं नोकरीही केली. परंतु त्यात तो रमला नाही. त्यानंतर ‘जागो मोहन प्यारे’ या मालिकेतील ‘राहुल’ या विनोदी व्यक्तिरेखेमुळे पृथ्वीक महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचला.