११ वर्षांच प्रेम अन् लग्न; अशी आहे पृथ्वीक-प्राजक्ताची लव्हस्टोरी, अभिनेत्याने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 10:51 AM2024-10-31T10:51:27+5:302024-10-31T10:55:02+5:30
जवळपास ११ वर्षे एकमेकांना डेट करत होते पृथ्वीक-प्राजक्ता; अभिनेत्याने स्वत:च केला खुलासा.
Prithvik Pratap: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasya jatra) या कार्यक्रमातून अभिनेता पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) घराघरात पोहोचला. अगदी काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याने त्याची अनेक वर्षांपासूनची मैत्रीण प्राजक्ता वायकुळसोबत लग्नगाठ बांधली. २५ ऑक्टोबरच्या दिवशी पृथ्वीक लग्नबंधनात अडकला. त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला. अशातच नुकतीच सोशल मीडियावर पृथ्वीकने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याद्वारे अभिनेत्याने त्यांच्या रिलेशनशिपविषयी खुलासा केलाय.
पृथ्वीक प्रतापने इन्स्टाग्रामवर त्याच्या लग्नाचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहलंय, "३०-१०-२०१३ पासून ३०-१०-२०२४ पर्यंत. माझ्या आयुष्यातील ११ वर्षांच्या भावभावनांचं Visual representation". या पोस्टवरून पृथ्वीक-प्राजक्ता गेली ११ वर्ष एकमेकांना डेट करत होते, असं समजतंय.
कोणताही गाजावाजा न करता अगदी साध्या पद्धतीने दोघांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली. लग्नाचा खर्च वाचवून हे जोडपं दोन मुलांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणार आहेत. पृथ्वीकच्या या निर्णयाचं त्याचे चाहते भरभरुन कौतुक करत आहेत. अभिनेत्याचा लग्नसोहळा अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. या नवीन जोडप्याचा लग्नातील लूक सुद्धा अगदी लक्ष वेधून घेणारा होता. पृथ्वीकने त्याच्या लग्नात पांढरा कुर्ता आणि धोतर नेसलं होतं. तर, त्याची पत्नी प्राजक्ताने लग्नात ऑफ व्हाइट सोनेरी रंगाची साडी नेसली होती. दोघांच्या लग्नाच्या फोटोंवर हास्यजत्रेतील कलाकारांसह नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळालं.