"आयुष्यातला महत्वाचा टप्पा तू...", पृथ्वीकला भावाने दिल्या खास अंदाजात शुभेच्छा,म्हणतो-'तुझा आणि प्राजक्ताचा...'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 09:54 AM2024-10-26T09:54:04+5:302024-10-26T09:57:14+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम (Maharashtrachi Hasyajatra) अभिनेता पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) काल (२५ ऑक्टोबर) या दिवशी विवाहबंधनात अडकला.
Prithvik Pratap: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम (Maharashtrachi Hasyajatra) अभिनेता पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) काल (२५ ऑक्टोबर) या दिवशी विवाहबंधनात अडकला. अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्याचा विवाहसोहळा संपन्न झाला. पृथ्वीकने त्याची गर्लफ्रेंड प्राजक्ता वायकूळसोबत लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करत अभिनेत्याने चाहत्यांना सुखद धक्काच दिला. पृथ्वीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर समोर येताच चाहत्यांसह मराठी कलाकारांनी या नवोदित जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, पृथ्वीकचा मोठा भाऊ प्रतीकने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
पृथ्वीक प्रतापच्या मोठ्या भावाने त्याला लग्नाच्या हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. लाडक्या भावाचे लग्नातील फोटो शेअर करत प्रतीकने कॅप्शनमध्ये लिहलंय, "प्रिय पृथ्वीक, आयुष्यातली सर्वात महत्वाचा टप्पा तू आज अगदी शांततेत आणि साधेपणाने पार पाडलास. तुझा आणि प्राजक्ताचा पुढचा प्रवास असाच शांततेत आणि साधेपणाने पार पडावा. हीच मंगलकामना. आज कुटुंब पूर्ण झालं.आम्हाला दिलेल्या या सुखद क्षणांसाठी थँक्यू! मुलाचं लग्न आज पार पडलं. लव्ह यू”,अशी पोस्ट प्रतीक कांबळेने केली आहे.
पृथ्वीक प्रतापच्या लग्नाचे फोटो पाहून त्यावर मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकर, सायली संजीव तसेच अभिजीत खांडकेकर, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव यांनी प्राजक्ता व पृथ्वीकचं अभिनंदन केलंय.
पृथ्वीकच्या निर्णयाचं होतंय कौतुक
पृथ्वीक प्रतापने अगदी साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय का घेतला, यामागे खास कारण आहे. पृथ्वीकने दोन मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. लग्नाचा खर्च वाचवून हे जोडपं दोन मुलांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणार आहेत.
"मला आधीपासून हा क्षण अगदी साध्या पद्धतीने घरच्यांच्यासोबतीने साजरा करायचा होता आणि लग्नाचा सगळा खर्च आम्ही दोघे एका सामाजिक कारणासाठी वापरणार आहोत. आम्ही दोन मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी घेत आहोत. आमच्या लग्नाचा खर्च हा आम्ही या मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी करणार आहोत. खरंतर असं काही करून कोणाचं तरी आयुष्य अजून सुंदर बनवता येतंय यातच सगळं आलं आणि आमच्या लग्नाचं हेच बेस्ट गिफ्ट आहे, असं आम्हाला वाटतं". पृथ्वीकच्या या निर्णयाचं त्याचे चाहते भरभरुन कौतुक करत आहेत.