शूटींगला जायचे तेव्हा खूप मोठा गिल्ट घेऊन..., ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 03:44 PM2022-06-17T15:44:00+5:302022-06-17T15:46:48+5:30
Maharashtrachi Hasya Jatra, Namrata Sambherao : नम्रता स्टेजवर आली रे आली की हास्याचे कारंजे फुलू लागतात. स्किट कुठलंही असो, त्यात ती कॉमेडीचे असे काही रंग भरते की हसून हसून पोट दुखतं. सध्या मात्र याच नम्रताची एक भावुक पोस्ट व्हायरल होतेय.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra) या कॉमेडी शोमध्ये कधी लॉली, कधी बिहारी बुधिया, कधी इन्सपेक्टर आणि कधी आजीबाई बनणारी नम्रता संभेराव ( Namrata Sambherao) म्हणजे एक भन्नाट रसायन. नम्रता स्टेजवर आली रे आली की हास्याचे कारंजे फुलू लागतात. स्किट कुठलंही असो, त्यात ती कॉमेडीचे असे काही रंग भरते की हसून हसून पोट दुखतं. पण सध्या मात्र याच नम्रताची एक भावुक पोस्ट व्हायरल होतेय. होय, आईपण काय असतं? कामकाजी आया मनात कोणता गिल्ट घेऊन वावरतात? कामासाठी सतत घराबाहेर राहताना लेकराला घरी एकटं सोडून येताना त्यांच्या मनाची काय अवस्था होते? हे सगळं तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
नम्रताजा रूद्राज नावाचा एक गोंडस मुलगा आहे. मुलासोबतचे अनेक फोटो ती शेअर करत असते. सध्या तिने त्याचे फोटो शेअर करत एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.
ती लिहिते, ‘माझं जग रुद्राज, एक गोष्ट शेअर करावीशी वाटतेय मला. असं वाटतंय की ही सगळ्या आयांची गोष्ट आहे. रुद्राज च्या जन्मानंतर एक काळ असा होता की मी प्रचंड पझेसिव्ह झाले होते रुद्र्राज बाबतीत.. मी जेव्हा शूटिंगला जायचे तेव्हा खूप मोठा गिल्ट घेऊन बाहेर पडायचे. माझ्या बाळाला मला वेळ नाही देता येत, तो मला जीव लावेल न? सतत आई आई म्हणत माझ्या अवतीभोवती फिरेल न ? एकदा तर आई तू नको, मला भरवू आज्जी भरवेल असं तो म्हणल्यावर मी ढसाढसा रडले होते. तेव्हा योगेश ने समजवलं, लहान आहे तो , पाचव्या मिनिटाला जवळ घेईल, आणि अगदी तसं व्हायचंही. आता काही एक महिने लोटल्यावर जेव्हा त्याच्या तोंडून मला आई पाहिजे, आई तू माझी आहे न , आई मला भेट नं असं म्हणतो तेव्हा माझं काय होतं हे मी शब्दात नाही मांडू शकत. खूप भारी वाटतं, अजूनही नाही विश्वास बसत की जगातली सगळ्यात मौल्यवान गोष्ट माझ्याकडे आहे माझं लेकरू, रुद्राज.’
आपण कॉमेडी करू शकू, असा विचारही नम्रताने कधी केला नव्हता. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ हा शो तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. चार फायनलिस्टपैकी ती एक होती. तिथून नाव मिळालं मग कामं मिळायला लागली.पण तोपर्यंत आपल्याला कॉमेडी करता येते याची तिला कल्पनाही नव्हती. मग फू बाई फू, कॉमेडी एक्सप्रेस, कॉमेडीची बुलेट ट्रेन, नसते उद्योग या विनोदी कार्यक्रमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
सासरी तिला कधीच ‘तू हे कर किंवा हे करू नकोस’ अशी बंधनं घातली नाहीत. तिच्या पतीला या क्षेत्राची आवड होती. त्यामुळे त्यांनी तिला कधीच अडवलं नाही.