'एका तासाची सोय होईल का?' वनिता खरातला आला अज्ञात व्यक्तीचा वाईट अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 03:02 PM2024-03-12T15:02:50+5:302024-03-12T15:03:23+5:30
Vanita kharat: रेल्वे स्टेशनवर आला वनिताला वाईट अनुभव, सांगितला थक्क करणारा प्रसंग
छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय असलेला रिअॅलिटी शो म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra). या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार आज प्रेक्षकांना आपलासा वाटतो. यामध्येच अभिनेत्री वनिता खरात (Vanita kharat) हिची तर नेटकऱ्यांमध्ये तुफान क्रेझ आहे. वनिताने मराठीसह बॉलिवूडमध्येही तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे तीच चर्चेत असते. परंतु, सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
एका अनोळखी व्यक्तीने तिला थेट एका तासाची सोय होईल का? असा विचित्र प्रश्न विचारला होता.
वनिताने अलिकडेच 'आसोवा' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या आयुष्यात घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला. विशेष म्हणजे तिच्यासोबत ज्यावेळी हा प्रसंग घडला त्यावेळी ती सुन्न झाली होती.
नेमकं काय घडलं वनितासोबत?
"त्या दिवशी मी दादरला माझ्या एका मैत्रिणीला सोडायला गेले होते. तेव्हा तिथे एका कट्ट्यावर आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि ती मैत्रीण वॉशरुमला गेली होती. त्यावेळी तिथे दोन पुरुष आले आणि त्यांनी मला विचारलं की, नाशिकला जाण्यासाठी गाडी कुठे मिळेल.. मी त्यांना प्लॅटफॉर्मवर जाऊन विचारा असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी पुन्हा मला विचारलं की बस वगैरे आहे का? त्यावर मी त्यांना जवळच एसटी स्टँड आहे सांगितलं. सोबतच तिथे जाऊन चौकशी करा असंही सांगितलं", असं वनिता म्हणाली.
पुढे ती म्हणते, "त्यानंतर पुन्हा दोन मिनिटे ते लोक तिथे घुटमळत राहिले आणि त्यांनी थेट मला विचारलं की, इथे अशी काही सोय आहे का? एका तासाची सोय होईल का? मी तो प्रश्न ऐकून थंडच पडले होते. जर मला कोणी अरे केलं तर मी त्याला थेट कानाखाली मारेल अशी मी मुलगी आहे. मात्र, त्यावेळी मी काहीच करु शकले नाही. त्यानंतर माझी मैत्रीण तिथे येताना त्यांनी पाहिलं आणि ते तिथून पसार झाले. पण, मला त्यावेळी प्रश्न पडला की हे माझ्या बाबतीत का झालं असेल? मात्र, हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट किस्सा आहे."
दरम्यान, वनिता आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने महाराष्ट्राची हास्यजत्रा व्यतिरिक्त काही मालिकांमध्येही काम केलं आहे. तसंच शाहिद कपूरच्या कबीर सिंग या सिनेमातही ती झळकली आहे.