'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बने याने जपली कोकणी परंपरा; चाळीत साजरा केला शिमगोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 10:49 AM2024-03-26T10:49:32+5:302024-03-26T10:50:52+5:30
Nikhil bane: निखिल कायम त्याच्या पोस्टमधून चाळसंस्कृतीचं दर्शन चाहत्यांना घडवत असतो.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyjatra) या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता, विनोदवीर म्हणजे निखिल बने (nikhil bane). एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या निखिलने आजही त्याचा साधेपणा जपला आहे. इतकंच नाही तर अफाट लोकप्रियता मिळवूनही तो आजही चाळीत राहतो. विशेष म्हणजे चाळ संस्कृती जपणाऱ्या निखिलने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
निखिल बऱ्याचदा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाळसंस्कृतीचं दर्शन चाहत्यांना घडवत असतो. चाळीत साजऱ्या केल्या जाणाऱ्या प्रत्येक सणवार, उत्सव, लहानमोठ्या कार्यक्रमात तो आवर्जुन सहभाग घेत असतो. यावेळी त्यांच्या चाळीत रंगपंचमीनिमित्त कोकणातील परंपरा जपली गेली. त्यांच्या चाळीमध्ये शिमगोत्सव साजरा करण्यात आला. या शिमगोत्सवात निखिलनेदेखील सहभाग घेतला होता.
निखिलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या चाळीमधील नागरिकांनी शंकासूर आणि गवळण यांचं समीकरण असेलले खेळे सादर केले. या खेळांमध्ये निखिलनेही टाळ वाजवत सहभाग घेतला होता.
दरम्यान, त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे तो कायम व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा जपताना दिसून येतो.