इंजिनिअरिंग ते हास्यजत्रा; मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या 'फुलराणी'चा प्रेरणादायी प्रवास 

By सुजित शिर्के | Published: October 8, 2024 12:31 PM2024-10-08T12:31:04+5:302024-10-08T12:33:15+5:30

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकप्रिय झालेल्या प्रियदर्शिनी इंदलकरसोबत दिलखुलास गप्पा.

maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshini indalkar talk about her journey in marathi film industry | इंजिनिअरिंग ते हास्यजत्रा; मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या 'फुलराणी'चा प्रेरणादायी प्रवास 

इंजिनिअरिंग ते हास्यजत्रा; मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या 'फुलराणी'चा प्रेरणादायी प्रवास 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून प्रियदर्शिनी इंदलकर हे नाव घराघरात पोहचलं. चित्रपट, मालिका तसेच वेब सीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेत्रीचा दांडगा वावर आहे. अगदी अल्पावधीतच तिने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. मुळची पुण्याची असलेली प्रियदर्शिनी एक इंजिनिअर असूनही तिने आपली आवड जपत अभिनयाची वाट धरली. नवरात्रीनिमित्त जाणून घेऊयात प्रियदर्शिनी इंदलकरच्या कलाविश्वातील प्रवासाबद्दल.

>>> सुजित शिर्के 

सध्या सगळीकडे नवरात्रीचा उत्साह आहे या निमित्ताने तुझ्या आयुष्यात आलेल्या नवदुर्गा कोण आहेत? ज्यांचं मार्गदर्शन तुझ्यासाठी मोलाचं ठरलं?

माझी आजी ही मला याबाबतीत फार ग्रेट वाटते. म्हणजे आपल्या आयुष्यातील आदर्श म्हणतो, ते स्थान माझ्या आयुष्यात माझ्या आजीचं आहे. वयाच्या खूप लवकर म्हणजेच १५ व्या वर्षी तिचं लग्न झालं होतं. शिवाय माझ्या आजोबांच्या नंतर बराच संसार तिनं एकटीनेच पेलला आहे. त्यात आर्थिक परिस्थितीही फार बरी नव्हती. त्यामुळे पत्र्याच्या खोलीपासून जागा घेऊन स्वत: चं घर बांधेपर्यत बराच मोठा पल्ला तिनं गाठला. ज्या पद्धतीने अनेक संकटांचा सामना करत तिनं मुलांना वाढवलं. याखेरीज दोन मुलांचा एकटीनं सांभाळ करणं शिवाय नोकरी सांभाळून हे करणं खूप कठीण आहे. आजच्या काळात सगळ्या सुख-सोयी उपलब्ध असतानाही हे कठीण आहे. त्याकाळात तिनं ज्या पद्धतीने यश मिळवलं आणि ज्या पद्धतीने तिनं सगळं पुन्हा उभं केलं, तो माझ्यासाठी आदर्श आहे. ते आयुष्यात मला कायम लक्षात राहतं.



इंजिनिअरिंगच शिक्षण घेतलेली प्रियदर्शीनी अभिनयाकडे कशी वळली?

मुळात मला 'एनएसडी'ला (नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा) जायचं होतं. हे माझं दहावीत असताना ठरलं होतं. तिथे ग्रॅज्यूएशनची डिग्री लागते. तेव्हा घरचे मला म्हणाले की, जर या क्षेत्रात पुढे काही झालं नाही तर नोकरीसाठी ऑप्शन बी तयार असावा. तर तू इंजिनिअरिंग कर. तर इंजिनिअर करण्यापूर्वी माझं ठरलं होतं की मला डिग्री घेऊन एनएसडीला जायचं आहे. मग खूप थिएटर केलं, वाचन केलं. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्यूएशनसाठी तिकडे जायचं ठरवलं. पण, दुर्दैवाने माझं तिकडे अ‍ॅडमिशन नाही झालं. इंजिनिअरिंग करण्याआधीच माझं ठरल होतं की मला अभिनयच करायचा आहे.



चित्रपट, वेब सीरिज शिवाय नाटक अशा तिन्ही माध्यमात तू काम केलं आहेस. या प्रवासातील एखादा अविस्मरणीय प्रसंग सांग. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' करण्याच्या सुरूवातीला मी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे. तेव्हा एका स्पर्धेच्या अंतिम फेरीत माझ्या घरचेही त्या ठिकाणी आले होते. त्या दरम्यान, एकुलती एक मुलगी तिचं पुढे कसं होणार ? याचं टेन्शन कुठल्याही बापाला येतं. त्यावेळी माझ्या बाबांना मी इंजिनिअरिंग करावं असं वाटत होतं. त्यादरम्यान, 'विनोदवीर' म्हणून मला गौरविण्यात आलं. त्याच्यानंतर माझ्या वडिलांना जेव्हा बोलायला लावलं तेव्हा ते प्रचंड भावुक झाले. तेव्हा पहिल्यांदा माझे बाबा म्हणाले की, "मला वाटतं हिनं हिचे करावं, तिला ते खूप छान जमतं". तो क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.


एखाद्या इव्हेंटमध्ये किंवा कुठेही तू तुझ्या हटके स्टाईलने सर्वांच लक्ष वेधून घेते. एकंदरीत तुझ्या कॉस्च्यूम डिझाईनची संकल्पना कोणाची असते?

बऱ्याचदा कॉस्च्यूम डिझायनची संकल्पना माझीच असते. आजकाल कशा पद्धतीच्या ज्वेलरीस इतर सेलिब्रिटी घालतात किंवा मोठ-मोठे स्टाइलिस्ट कशा पद्धतीने स्टाईल करतात त्यांच्याकडे नीट लक्ष असतं ते करण्याचा माझा प्रयत्न असतो. शिवाय आपल्या इंडस्ट्रीतही चांगले स्टाईलिस्ट आहेत. ज्याच्याकडून मी स्टाईल झाली आहे. अलिकडेच एका रिसेंट लूकची चर्चा होती. दहिहंडीच्या दरम्यान लेबल पोशाखने मला तयार केलं होतं. त्या लूकची देखील चर्चा रंगली. शिवाय मला आवडतं वेगवेगळ्या स्टाईल्मध्ये स्वत: ला पाहायला आणि ते करायला. खरंतर, त्याच्यामागे खूप कष्ट लागतात. पण तेवढा त्या गोष्टींना वेळ देणं आणि तयार होणं ही गोष्ट हळूहळू आवडायला लागली आहे. 



इंडस्ट्रीत कास्टिंग काउचचे अनेक प्रकार समोर येतात. तुला असा काही अनुभव आलाय का? 

मी स्वत: ला याबाबतीत खूप नशीबवान समजते. सुदैवाने मला कास्टिंग काऊचचा कधीच अनुभव आलेला नाही. मला माहित नाही बाकीची इंडस्ट्री कशी आहे? काय आहे? पण, माझ्याबाबतीत असं नाही घडलं. मला रोल मिळविण्यासाठी असं करशील का? त्यासाठी कधीच मला समोरून विचारणा करण्यात आली नाही. त्यामुळे सुदैवाने मला असा काही अनुभव नाही आलाय. त्यामुळे खरंतर, मी स्वत: ला खूप नशीबवान समजते. 

मुळची पुण्याची असलेल्या प्रियदर्शिनीला मुंबईत स्वत: ला अॅडजस्ट करण्यात काही अडचणी आल्या का?

खरंतर, मला मुंबईत फार आवडायला लागली जेव्हापासून मी इथे आली आहे. कारण इथे सगळी ध्येयवादी माणसं आहेत. मुंबईत स्वप्नांच्या मागे धावणारी माणसं आहेत. नं झोपणारं, नं थकणारं, हे शहर आहे. पुण्यातील वातावरण हे निवांत असं आहे. पण, त्याच्यापेक्षा मी मुंबईच्या धावत्या वातावरणात खूप रमले. मला ते आवडतं. शिवाय मला अशी लाईफस्टाईल जास्त आकर्षक वाटते. सुरूवातीला मला मुंबईत ईस्ट-वेस्ट कळायला वेळ लागला. हळूहळू या गोष्टींची सवय झाली. यासाठी मोबाईलचा खूप उपयोग झाला. कधीकधी असंही वाटतं की स्वत: च्या घरापासून दूर राहून स्वत चं वेगळं आयुष्य सुरू करणं, हे मला आवडतं. या सगळ्या प्रवासात मला मुंबईची साथ लाभली. म्हणून मला मुंबईची ओढ आहे. 



चित्रपट, मालिका, वेब सीरिज की आणखी काही प्रियदर्शीनी आम्हाला कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार?

कदाचित प्रियदर्शिनी रंगभूमीवर दिसण्याची शक्यता आहे. शिवाय महाराष्ट्राची हास्यजत्रा परत काही कालावधीने सुरू होईल. शिवाय काही चित्रपट रिलीज होण्याच्या वाटेवर आहेत, त्याची प्रतीक्षा करते आहे.

Web Title: maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshini indalkar talk about her journey in marathi film industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.