'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम ओंकार भोजनेला लागली आणखी एक लॉटरी, जाणून घ्या याबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 04:41 PM2023-02-18T16:41:21+5:302023-02-18T16:42:04+5:30
Maharashtrachi Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून ओंकार भोजने घराघरात पोहचला आहे. या शो मधून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या शोमधून ओंकार भोजने(Onkar Bhojane)ला चांगलीच लोकप्रियता मिळाली. हास्यजत्रेत असताना चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. त्यामुळे कधी कधी तो शोमध्ये दिसत नव्हता. मात्र ओंकारला झी मराठी वाहिनीने संधी देऊ केली तेव्हा तो फु बाई फुच्या नवीन पर्वात पाहायला मिळाला. तेव्हापासून ओंकारने हास्यजत्रा सोडली अशा चर्चा रंगू लागल्या. मात्र जिथे त्याला संधी मिळेल तिथे त्याने प्रेक्षकांची मने जिंकावीत असा सल्ला चाहत्यांकडून मिळू लागला. काही दिवसातच प्रेक्षकांचा पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे फु बाई फुचा शो बंद करावा लागला.
फु बाई फुमुळे ओंकार आणि हास्यजत्राच्या कलाकारांमध्ये काहीतरी बिनसलंय अशी चर्चा सुरू झाली होती. पण त्यानंतर काही दिवसातच ओंकारचा प्रमुख भूमिका असलेला सरला एक कोटी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. ओंकारकडे हिंदी चित्रपट देखील आहे, त्यामुळे त्याचं शेड्युल व्यस्त असल्याचे बोलले जाते. अशातच आता ओंकारला आणखी एक लॉटरी लागली आहे. चक्क महेश मांजरेकर यांनी त्याला ही संधी देऊ केली आहे.
ओंकार भोजने लवकरच एका नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. करून गेलो गाव हे नाटक नव्या रुपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाच्या निर्मितीची धुरा महेश मांजरेकर आणि राहुल भंडारे यांनी सांभाळली आहे. तर चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम ओंकारला साथ देणार आहे.
करून गेलो गाव हे व्यावसायिक नाटक मालवणी भाषेत आहे. मालवणी भाषेवर प्रेक्षकांचं अतूट प्रेम आहे. ओंकारने कॉलेजमध्ये असताना अनेक एकांकिका स्पर्धा गाजवल्या होत्या. त्यामुळे रंगभूमीशी त्याचं नातं देखील गेल्या अनेक वर्षांचं आहे. जोडीला भाऊ कदम यांची साथ त्याला मिळणार असल्याने नाटक पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. करून गेलो गाव नाटकाचे लेखन, दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केले आहे.